सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा बदलावी लागेल : बोराडे

सिंचन परिषदेचे उदघाटन
सिंचन परिषदेचे उदघाटन

सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन करून उपयोग होणार नाही. पाणी या विषयापुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांची दशा पाहून यापुढे सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा बदलावी लागेल, असे मत कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

सोयगाव येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शनिवारी (ता. १३) १९ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेला सौर ऊर्जेवरील सूक्ष्म सिंचनाच्या प्रात्यक्षिकाच्या उद्‍घाटनाने सुरवात झाली. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र सिंचन सहयोग व जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांच्या संयुक्‍त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी, सिंचन, प्रक्रिया उद्योग आणि बाजार व्यवस्था या विषयांवर परिषद होत आहे. या वेळी उद्‍घाटक म्हणून श्री. बोराडे बोलत होते.

परिषदेच्या उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परिषदेचे स्वागताध्यक्ष रंगनाथनाना काळे होते. आमदार सतीश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अशोक तेजनकर, जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप देशमुख, जैन इरिगेशन सिस्टीमचे वरिष्ठ कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष बापू अडकिने, कर्नाटक विद्यापीठाचे वनस्पती विभागशास्त्र प्रमुख डॉ. गणेश हेगडे, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे भूगोलतज्ज्ञ डॉ. पी. एन. गोफने, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश काळे या वेळी उपस्थित होते.

श्री. बोराडे म्हणाले, की देशाच्या एकूण उत्पन्नात केवळ सहा टक्केच वाटा असेल, तर मग शेतीवर दुष्काळ आला की बाजारावर संकट का येते? ५ ते ११ दिवसांत पडणाऱ्या पावसावर पिके तग कशी धरू शकतील? सीलिंग अॅक्ट, जीवनावश्यक वस्तू कायदा, भूसंपादन फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत. सिंचन परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता आहे. कोणतेही सरकार सत्तेत आले तरी शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असे वाटत नाही.

ॲड. प्रदीप देशमुख म्हणाले, की पाण्याचे समन्यायी वाटप महत्त्वाचे आहे. जल आराखड्यात आपले स्थान काय हे सामान्य माणसाला माहिती व्हायला हवे, त्यासाठी त्याचे प्रारूप पुढे यावे.  कुलगुरू डाॅ. अशोक तेजनकर म्हणाले, की सिंचन परिषदेच्या निमित्ताने टंचाई स्थितीचा तालुकानिहाय अभ्यास व्हायला हवा.

डाॅ. माधवराव चितळे म्हणाले, की अधिक लोकांना लाभदायक अशी सिंचन व्यवस्था निर्माण करायला हवी. सिंचन व्यवस्थेत वित्तीय सक्षमतेचा विचार करावा लागेल. त्यासाठी पाणलोट, उपखोरेनिहाय बैठका व्हाव्यात. नियमांमध्ये अनुकूल बदल होत आहेत. आर्थिक- सामाजिक प्रगती मार्गी लावण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी पीक रचनेबाबत आंधळे राहून चालणार नाही. प्रत्येक पाणलोटने याचा विचार करायला हवा. कारण परिस्थितीचा अभ्यास करता, प्रत्येक पाणलोट आणि खोऱ्याची स्थिती सारखी नाही. प्रत्येक उपखोऱ्यातील पाण्याचा वापर कसा असावा याविषयी मंथन व्हायला हवे. पाणी हा विषय सरकारवर सोपवून चालणार नाही. पावसाच्या अनियमिततेमुळे दोलायमान होत असलेली उत्पादन व्यवस्था चिंतेची बाब आहे. अवर्षणप्रवण भाग कृषी उत्पन्नावर अवलंबून राहता कामा नये. प्रतिघनमीटर पाण्यावर होत असलेल्या उत्पादनाची साठवण व्यवस्था, बाजार व्यवस्था, निर्यातीशी सांगड घालावी लागेल.

रंगनाथनाना काळे यांचे स्वागतपर भाषण झाले. उद्‍घाटन सत्रानंतर ग्रामीण विकासाच्या नव्या दिशा याबाबत डाॅ. माधवराव चितळे, डाॅ. सुधीर भोंगळे यांनी पीक प्रक्रियेसाठीचे वाण याविषयी, भूजल संवर्धनाविषयी डाॅ. अशोक तेजनकर यांनी, तर एकात्मिक सेंद्रिय शेती व थेट विक्री याविषयी ज्ञानेश्वर बोडके, पाइपलाइन वितरण प्रणालीविषयी बापू अडकिने यांनी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com