जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
नारायणगाव येथे होणार टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प
पुणे जिल्ह्यासाठी टोमॅटो पिकाची निवड करण्यात आली असून, लवकरच नारायणगाव व अन्य ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी २७५ कोटींचे अर्थसाहाय्य मिळणार आहे.
पुणे : कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील कोलमडलेल्या अर्थकारणाला कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेवर प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र उत्पादनाची निवड करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी टोमॅटो पिकाची निवड करण्यात आली असून, लवकरच नारायणगाव व अन्य ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून एका प्रकल्पासाठी २७५ कोटींचे अर्थसाहाय्य मिळणार आहे.
कोरोना काळात ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळेच केंद्र शासनाने ग्रामीण अर्थव्यवस्था व कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनाने एक जिल्हा एक उत्पादन निवड करून त्या उत्पादनाच्या दृष्टीने प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत नाशवंत कृषिमाल, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मांस प्रक्रिया, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, किरकोळ वन उत्पादने आदी उत्पादनांचा समावेश आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी कृषी विभागाकडून भाजीपाला आणि टोमॅटो प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यामध्ये केंद्राने टोमॅटोची निवड केली.
अशी असेल योजना
जिल्ह्यात ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यात प्रकल्पांची उभारणी करताना केंद्र शासनाकडून ६० टक्के व राज्य शासनाकडून ४० टक्के अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. तसेच यासाठी प्रशिक्षणाचा शंभर टक्के खर्च शासन करणार आहे.
नारायणगाव, पुरंदर येथे टोमॅटो प्रोसेसिंग युनिट
जिल्ह्यात सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन जुन्नर तालुक्यात होत असून, पहिले टोमॅटो प्रोसेसिंग युनिट नारायणगाव येथे उभारण्यात येणार आहे. तसेच पुरंदर तालुक्यातून देखील यासाठी प्रस्ताव आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.
- 1 of 691
- ››