इटलीमध्ये एकाच दिवसात ७९३ बळी; जगाचे व्यवहार ठप्प

जगभरातील परिस्थिती  पाकिस्तान सरकारने विदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली असतानाही विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ लंडनहून पाकमध्ये दाखल.  अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स आणि त्यांच्या पत्नीला संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट  अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू पाऊलो दायबाला कोरोनाचा संसर्ग  संसर्गग्रस्तांची संख्या एक हजारांवर गेल्याने आफ्रिकेतील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन.  पंधरा दिवसांत कोरोनावर उपाय शोधणार असल्याचा इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांचा दावा, इराणमध्ये मृतांची संख्या १,५५६ वर
इटलीमध्ये एकाच दिवसात ७९३ बळी; जगाचे व्यवहार ठप्प
इटलीमध्ये एकाच दिवसात ७९३ बळी; जगाचे व्यवहार ठप्प

रोम : जगभरातील बळींची संख्या तेरा हजारांवर गेली असून कोरोना विषाणूने जगभरातील बहुतेक सर्व लहान-मोठ्या, गरीब-श्रीमंत, भांडवलदार-साम्यवादी देशांना झटका दिल्याने सगळीकडचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. बळींच्या संख्येत चीनलाही मागे टाकणाऱ्या इटलीमध्ये रविवारी (ता.२२) एकाच दिवशी ७९३ जणांचा बळी गेल्याने हा देश हादरून गेला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन आणि संचारबंदी असल्याने जवळपास एक सप्तमांश लोकसंख्या घरीच अडकून पडली आहे. कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू बनलेल्या इटलीमध्ये संसर्गग्रस्त रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ८.९ टक्के आहे. रविवारी एकाच दिवशी येथे ७९३ जणांचा बळी आत्तापर्यंत गेला असून एकूण ४,८२५ मृत्युमुखी पडले आहेत. इटलीत आत्तापर्यंत ६०६२ रुग्ण बरे झाले असले, तरी केवळ २४ तासांत ४८०० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.  फ्रान्समध्ये गेल्या चवीस तासांत १८४७ कोरोनाबाधित आढळले असून, आत्तापर्यंत १४४५९ पर्यंत रुग्णांची संख्या गेल्याचे तेथील आरोग्य विभागाने सांगितले; तर रविवारपर्यंत ५६२ जण यामुळे बळी गेले. एकूण ६,१७२ जण रुग्णालयात असून यातील १५२५ जण अतिदक्षता विभागात आहेत.  पाकिस्तानमध्ये ५०० बाधित कोरोनामुळे पाकिस्तानात आत्तापर्यंत ५०१ बाधित झाले आहेत. यात सिंध प्रांतात २५२ जणांचा समावेश आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला कोरोना समस्येचा निपटारा करण्यासाठी ५८८ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली.  तीन दिवसांनंतर पहिला रुग्ण बीजिंग : कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा चीनने दावा केला असून, त्यांच्याकडे तीन दिवसांच्या खंडानंतर रविवारी कोरोनाचा संसर्ग झालेला स्थानिक रुग्ण आढळला आहे. तसेच, येथे ४५ विदेशी लोकांनाही संसर्ग झाल्याचे सिद्ध झाल्याने कोरोनाची ही दुसरी लाट थोपविण्यासाठी चीन सरकार अधिक कडक उपाययोजना राबविण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आज सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानमध्ये मात्र कोणताही रुग्ण आढळलेला नाही.

आशियातील देशांमध्ये उपाययोजना हाँगकाँग : कोरोनाचा केंद्रबिंदू आशियातून युरोपकडे सरकला असला, तरी आशियातील अनेक देशांनी संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. मलेशियाने लॉकडाऊन जाहीर केले असून, अंमलबजावणीसाठी सैन्याला उतरविले आहे. या देशात एकूण ९५ हजार जणांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये संसर्गग्रस्तांची संख्या आटोक्यात आली असली, तरी इतर देशांमध्ये मात्र आकडा वाढतच आहे. ऑस्ट्रेलियाने इतर देशांमधील नागरिकांना बंदी केली असून, आपल्या नागरिकांनाही प्रवास टाळण्याची सूचना केली आहे. या देशात बाधितांची संख्या १३०० च्या वर गेली आहे. भारतातही आज ‘जनता कर्फ्यू’ होता.

दूतावासात मागितला आश्रय लंडन : युरोपातून येणाऱ्या विमानांना भारताने बंदी घातल्याने येथे अडकून पडलेल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाच्या परिसरात आश्रय देण्याची मागणी केली आहे. लंडनमध्ये एकूण ५९ विद्यार्थी अडकून पडले होते. मात्र, येथील भारतीय समुदायाच्या संघटनेने त्यांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्या राहण्याची सोय घरांमध्ये करून दिली. चाळीस विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. मात्र, १९ जणांनी ही मदत नाकारली. आता त्यांनी दूतावासात आश्रय मागितला आहे. सध्या हे विद्यार्थी दूतावासातीलच विलगीकरण कक्षात राहत आहेत.

इराणमध्ये १२९ बळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इराणमध्ये नव्याने १२९ रुग्ण बळी गेले असून, आत्तापर्यंत १६८५ मृत्युमुखी पडले आहेत; तर २१६३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणू ही अमेरिकेचीच निर्मिती असू शकते, अशी शंका उपस्थित करत इराणने अमेरिकेने देऊ केलेली मदत स्पष्टपणे नाकारली आहे.

अमेरिकेची मदत इराणने नाकारली तेहरान : कोरोना विषाणू ही अमेरिकेचीच निर्मिती असू शकते, अशी शंका उपस्थित करत इराणने अमेरिकेने देऊ केलेली मदत स्पष्टपणे नाकारली. इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने त्यांना औषधे देण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली होती. मात्र, अमेरिका औषधांमार्फत विषाणूच आमच्याकडे पाठवेल. कारण, हा विषाणू इराणला नष्ट करण्यासाठीच तयार केला गेला आहे, असा संशय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रसार चीनमधून झाल्याचा दावा केला जात असला, तरी चीनने हा दावा फेटाळताना अमेरिकेकडेच संशयाची सुई फिरविली आहे.

संसर्गाचा वेग वाढतोय... लंडन : प्रगत म्हणून गणल्या गेलेल्या देशांना कोरोनाने भयग्रस्त केले असून, त्याचीच झलक ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वक्तव्यातून दिसून आली. आपण इटलीपेक्षा केवळ दोन ते तीन आठवडेच मागे आहोत. त्यामुळे काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी ब्रिटनवासीयांना केले आहे. ‘देशातील जवळपास १५ लाख लोकांना संसर्गाचा धोका असून, त्यांनी पुढील १२ आठवडे घरातच राहावे. आपल्या देशात संसर्गाचा वेग वाढतो आहे. इटलीमधील आरोग्य यंत्रणा उत्कृष्ट आहे आणि तरीही तिथे जनतेचे हाल होत आहेत. आपण त्यांच्यापेक्षा दोन ते तीन आठवडेच मागे आहोत. त्यामुळे नागरिकांनी घरीच बसून सहकार्य करावे,’ असे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे.

राणी एलिझाबेथच्या सहकाऱ्याला संसर्ग बकिंगहॅम महालातील राजघराण्याच्या कर्मचारीवर्गातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राणी एलिझाबेथ सध्या त्यांच्या खासगी विंडरस महालात गेल्या असल्या, तरी त्या तेथे जाण्याआधीच या कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे बोलले जाते. संबंधित कर्मचाऱ्याचा ज्यांच्याशी संबंध आला, त्या सर्वांना एकांतवासात पाठविण्यात आले आहे. बकिंगहॅम महालात पाचशेहून अधिक कर्मचारी काम करतात.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com