महापुराने कोलमडले सातारा जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांचे गणित

मजुरांचा प्रश्न, भांडवल, आर्थिक नियोजन आणि वाढत्या महागाईचा फटका गुऱ्हाळघरांना बसला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गुऱ्हाळघरांना उतरती कळा लागली आहे. त्यातच यंदा आलेल्या महापुराने कृष्णा-कोयना नदीकाठच्या ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा गुऱ्हाळांना ऊसटंचाई भारणार असून, अनेक गुऱ्हाळघरे सुरू होतील की नाही याबाबत शंकाच आहे. - प्रकाश पाटील, अध्यक्ष, गुऱ्हाळमालक संघटना.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा : तब्बल १४ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या महापुराने शेती पिकांना मोठा फटका बसला. त्यात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचा समावेश आहे. त्यामुळे यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा आर्थिक फटका बसणार आहे. एकीकडे साखर कारखान्यांची अशी स्थिती असताना, गुऱ्हाळघरांचे तर गणितच कोलमडून गेले आहे. महापुराच्या फटक्‍याने उसाचे उत्पादन घटणार असल्याने अनेक गुऱ्हाळघरे यंदा अजूनही सुरू झालेली नाहीत आणि ती सुरू होतील याचीही खात्री राहिलेली नाही. त्यामुळे गूळ उत्पादनही घटणार आहे. 

कृष्णा- कोयना या बारमाही नद्यांमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेती बागायती आहे. या तालुक्‍यातील शेतकरी कर्ज काढून, उसनेपासने करून पिके घेतात. त्यातून चांगले उत्पन्नही शेतकऱ्यांना मिळते. मात्र, २००५-०६ नंतर यंदा आलेला महापूर फारच मोठा होता. त्यात शेतकऱ्यांनी घेतलेली पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात सर्वाधिक फटका उसाला बसला. जिल्ह्यात ८० हजार ३१७ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. त्यापैकी १५ ते १६ हजार हेक्‍टरवरील ऊस महापुराने वाया गेला आहे. त्यामुळे गाळपासाठी आडसाली २० हजार ३५५, पूर्वहंगामी १९ हजार ४४०, सुरूचा १२ हजार ८०२, खोडव्याचा २७ हजार ७८१ हेक्‍टर ऊस उपलब्ध होता.

मात्र, नदीकाठचा ऊस पुरात बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर साखर कारखान्यांपुढेही यंदाच्या महापुरामुळे ऊसटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या ऊस या मुख्य पिकालाच फटका बसल्याने यंदा साखर कारखान्यांचाही हंगाम कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांवरही आर्थिक कुऱ्हाड कोसळण्याची वेळ आली आहे. अशी स्थिती साखर कारखान्यांची असल्याने गुऱ्हाळघरांनाही त्याचा फटका बसणार आहे. 

पूर्वी ऑगस्ट महिन्यात सुरू होणारी गुऱ्हाळघरे सप्टेंबर महिना संपला तरी अजूनही सुरू झालेली नाहीत. त्याचबरोबर ती सुरू होतील की नाही याबाबतही शंकाच आहे. त्यामुळे यंदाच्या महापुराच्या फटक्‍याने गुऱ्हाळघरांचेही गणित कोलमडणार आहे. त्याचा परिणाम गुळाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com