जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दर

जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दर
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल आवक झाली. सुरवातीच्या दरांचा लाभ ज्वारी उत्पादकांना काहीसा मिळत असून, सरासरी ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

आवक जळगाव, पाचोरा, जामनेर व धरणगाव भागांतून सुरू आहे. कोरडवाहू क्षेत्रात ओलावा नसल्याने पेरणी नगण्य झाली होती. गिरणा व तापी नदीकाठीच पेरणी झाली होती. ऑक्‍टोबरमध्ये पेरणी केलेल्या दादरची मळणी जवळपास पूर्ण झाली आहे. तर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पेरणीच्या दादरची मळणी व्हायला अजून महिनाभर वेळ लागेल. ज्यांनी आगाप पेरणी केली, त्यांनाच या दरांचा लाभ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील हंगामात दादरला सुरवातीला कमाल २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. या हंगामात दर बऱ्यापैकी असून, ते टिकून राहतील, असा अंदाज आहे. 

जळगावसह चोपड व अमळनेरच्या बाजारातही दादरची कमी अधिक स्वरूपात आवक मागील आठवड्यातच सुरू झाली. अमळनेर बाजारात सर्वाधिक प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंतची आवक झाल्याची माहिती मिळाली. तेथेही दर ३१०० ते ३२०० पर्यंत आहेत. उत्पादन दर्जेदार असल्याने दरांबाबत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. पुढील आठवड्यात आवक वाढू शकते. 

दादरच्या कडब्यासही यंदा एकरी ११ हजार रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. हा कडबा कसदार व टिकाऊ मानला जातो. दुधाळ पशुधनासाठी अगदी धुळे, मध्य प्रदेशातील शेतकरी या कडब्याची खरेदी चोपडा, जळगाव, अमळनेर भागांतून करतात. एक एकरात किमान १७० ते २०० पेंढ्या कडबा मिळत आहे. मागील हंगामाच्या तुलनेत कडब्यास एकरी अडीच हजारांचा दर अधिक असल्याचे सांगण्यात आले.

तूर दर टिकून संकरित व पारंपरिक वाणांच्या तुरीचे दर महिनाभरापासून टिकून असून, तुरीची आवक फक्त रावेर, चोपडा, अमळनेर, मुक्ताईनगर व पाचोरा येथील बाजारात कमी अधिक स्वरूपात होत आहे. लागवडच फक्त १८०० हेक्‍टरपर्यंत होती. बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी असून, सध्या क्विंटलमागे ५३५० ते ५५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. पारंपरिक वाणांच्या तुरीला अधिक उठाव आहे. प्रमुख चार बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन ५०० क्विंटलपर्यंतच तुरीची आवक होत आहे. 

केळी दरांवर दबाव केळी दरांवर पाकिस्तानमधील निर्यात रखडत सुरू असल्याने दबाव आहे. यातच मागील आठवड्यात फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील एजंटनी केळीची पाकिस्तानात पाठवणूक करण्यास सपशेल नकार दिल्याने दर क्विंटलमागे २० ते ३० रुपयांनी कमी झाले. सध्या ९८० रुपये प्रतिक्विंटलचा दर नवती केळीला रावेर, यावल व मुक्ताईनगर भागांत मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com