ठिबकवरील ८० टक्के अनुदानासंबंधी जळगावला वगळले

ठिबकवरील ८० टक्के अनुदानासंबंधी जळगावला वगळले
ठिबकवरील ८० टक्के अनुदानासंबंधी जळगावला वगळले

जळगाव  ः उत्पादन वाढीसह शेती, शेतकऱ्यांना सिंचनासंबंधी प्रोत्साहनासाठी शासनाने ठिबक किंवा सूक्ष्मसिंचन अनुदान ८० टक्‍क्‍यांपर्यंत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु यातून जळगावला वगळले आहे.  जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील कुठल्याही भागाचा समावेश यात केलेला नसल्याची माहिती आहे. आत्महत्याग्रस्त व आवर्षणप्रवण जिल्ह्यांसाठी ही योजना शासनाने आणली आहे. त्याच्या मार्गदर्शक सूचना, सविस्तर माहिती जळगाव, धुळ्यातील कृषी यंत्रणांकडे अजूनही प्राप्त झालेली नाही. सध्या शासनातर्फे सूक्ष्मसिंचनासंबंधी ५० टक्के अनुदान दिले जाते. परंतु आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी, अवर्षणप्रवण भागात ठिबक, सूक्ष्मसिंचन तंत्राचा वापर वाढावा यासंबंधी शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील अनेक तालुके, भागासाठी ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, धरणगाव अवर्षण प्रवण आहेत. धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडामध्ये पर्जन्यमान कमी आहे. तर नंदुरबारमधील नंदुरबार, शहादामधील काही भागात अवर्षणप्रवण स्थिती असते. तसेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही या भागात आहे. साक्री, धुळे शिंदखेडा, पारोळा, नंदुरबार, अमळनेर या भागात टॅंकर अधिक असतात. फेब्रुवारीनंतर शिवार ओस पडते. असे असताना जळगाव, धुळे व नंदुरबारला सूक्ष्मसिंचनासंबंधी ८० टक्के अनुदान योजनेतून का वगळले, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अद्याप मार्गदर्शक सूचना आलेल्या नसल्याने या योजनेतील नेमक्‍या बाबी, समाविष्ट तालुके किंवा भाग याची माहितीदेखील कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

ठिबक सिंचनासंबंधीचे अनुदान धुळे, जळगाव जिल्ह्यांतही वाढवायला हवे. कारण या भागातही दुष्काळी स्थिती असते. या योजनेमुळे निश्‍चित अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.  - आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे (जि. धुळे)

ठिबकसंबंधी ८० टक्के अनुदान योजनेत धुळ्याचा समावेश आहे की नाही हे मार्गदर्शक सूचना आल्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल. अजून मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर अधिकची माहिती याबाबत देता येईल.  - विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com