जळगाव बाजारात मक्‍याची आवक नगण्य

जळगाव बाजारात मक्‍याची आवक नगण्य
जळगाव बाजारात मक्‍याची आवक नगण्य

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिलके व गवार यांची आवक मागील पंधरवड्यात प्रतिदिन अनुक्रमे दोन व एक क्विंटल राहिली. आवक कमी व उठाव बऱ्यापैकी आहे. दर टिकून असून, गवारीला मागील आठवड्यात प्रतिक्विंटल सरासरी ७५०० तर गिलक्‍यांना प्रतिक्विंटल सरासरी ६००० रुपये दर मिळाला. 

दुष्काळी स्थितीचा वेलवर्गीय व भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. गवार व गिलके व्यवस्थापनाच्या दृष्टीने दुष्काळी स्थितीत त्रासदायक ठरत असल्याने अनेक भागात पीक अपवादानेच आहे. जामनेर, पाचोरा, एरंडोल भागातच गिलके, गवार आहे. कूस असलेल्या गवारीचीच अधिक आवक होते. एक क्विंटलपर्यंतची सरासरी आवक मागील आठवड्यात गवारीची झाली. तर गिलक्‍यांची देखील सरासरी दोन क्विंटल आवक झाली. गवारीसह गिलक्‍यांना एकच दर जाहीर करण्यात येत आहे. लिलाव सर्वात आधी सकाळीच उरकले जातात. दोन-तीन अडतदारांकडे कूस असलेली गवार व गिलक्‍यांची आवक होते. 

भेंडीची आवकही मागील आठड्यात प्रतिदिन सरासरी पाच क्विंटल एवढी होती. दर २० ते ४५ रुपये प्रतिक्विंटल, असे मिळाले. सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. भेंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या धरणगावमधील धार, पथराड, वंजारी, झुरखेडा, रेल भागात दुष्काळाचा फटका बसल्याने लागवड अत्यल्प झाली आहे. आवक घटल्याने दर प्रत्येक आठवड्याला वधारत आहेत. भेंडीची आवक यावल, जळगाव, जामनेर भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले. 

हिरव्या मिरचीचे दरही टिकून राहिले. किमान २२ व कमाल ४० रुपये प्रतिकिलोचे दर बाजारात शेतकऱ्यांना मिळाले. तिखट, लहान, बारीक  प्रकारच्या मिरचीची आवक आंध्र प्रदेशातून होत आहे. तर आकाराने मोठ्या व फिकट हिरव्या मिरचीची आवक धुळे, जालना, जामनेर भागांतून होत आहे. तिखट मिरचीला एकच म्हणजेच ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. आवक प्रतिदिन १३ क्विंटलपर्यंत राहिली.

हरभरा दरात सुधारणा मक्‍याची बाजार समितीमधील आवक नगण्य आहे. लागवडच कमी झाल्याने या हंगामात आवक कमी आहे. रावेर, मुक्ताईनगर भागांत काही शेतकरी खेडा खरेदी करीत आहेत. दर २२०० रुपये प्रतिक्विंटलचा थेट जागेवर मिळत आहे. बाजारात आठवड्यातून दोन-तीन दिवसच आवक होते. देशी प्रकारच्या हरभऱ्याच्या दरातही काहीशी सुधारणा मागील आठवड्यात झाली. कमाल दर ४४०० रुपयांवर पोचले. १०-१२ दिवसांपूर्वी कमाल दर ४१०० रुपयांपर्यंत होते. काबुली हरभऱ्याची आवक जळगाव, पाचोरा, रावेर बाजार समितीत शून्यावर आहे. फक्त चोपडा, अमळनेर येथे काबुली हरभऱ्याची किरकोळ स्वरूपात आवक होत असून, त्यास प्रतिक्विंटल ५९०० रुपयांपर्यंतचे दर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com