जळगाव बाजारात हिरव्या मिरचीचे दर टिकून

जळगाव बाजारात हिरव्या मिरचीचे दर टिकून
जळगाव बाजारात हिरव्या मिरचीचे दर टिकून

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात हिरव्या मिरचीला सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक प्रतिदिन १६ क्विंटल एवढी झाली. आवक कमी व उठाव बऱ्यापैकी असल्याने दर टिकून राहीले. किमान २४०० व कमाल ४६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

बारीक, तिखट व आकाराने लहान असलेल्या मिरचीची अत्यल्प आवक होत असून, काही अडतदारांना ही मिरची आंध्र प्रदेशातून मागवून घ्यावी लागत आहे. या मिरचीची फक्त चार ते पाच क्विंटल आवक झाली. तर दर एकच म्हणजेच साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. आकाराने मोठ्या व कमी तिखट मिरची आवक जामनेर, पाचोरा, धुळे भागांतून होत आहे. या मिरचीला २४०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. आवक मार्च महिन्यापासूनच रखडत सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा, नंदुरबार तालुक्‍यांतील मिरचीचे क्षेत्र फेब्रुवारीतच उजाड झाल्याने या भागातील आवक कमी झाली. यामुळे दर टिकून आहेत. 

कूस असलेल्या गवारीची फक्त एक क्विंटल प्रतिदिन आवक झाली. या गवारीला प्रतिक्विंटल ६००० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक मागील आठवड्याच्या तुलनेत ५० किलोने घटली. अनेक भागांत जलसंकट असल्याने गवारीचे पीक शेतकऱ्यांनी काढायला सुरवात केली आहे. यामुळे आवक कमी झाली. कूस असलेल्या गवारीला चांगला उठाव राहिला. कारल्यांची आवक प्रतिदिन पाच क्विंटल एवढी राहिली. दर २२०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. कारल्यांचे दरही टिकून राहीले. आवक जामनेर, पाचोरा, चोपडा, यावल भागांतून होत आहे. 

अतिउष्णतेमुळे गिलक्‍यांच्या दर्जावर परिणाम झाल्याने दरांवर दबाव वाढल्याचे चित्र राहिले. गिलक्‍यांची प्रतिदिन चार क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपयांपर्यंत मिळाले. दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली. गिलक्‍यांची आवक जळगाव, यावल, जामनेर भागांतून होत आहे. गिलक्‍यांखालील क्षेत्र रिकामे करायला अनेक भागांत सुरवात झाल्याने पुढे गिलक्‍यांची आवक कमी होईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली. 

टोमॅटोचे दर व आवक स्थिर टोमॅटोच्या दरात मागील पंधरवड्यात झालेली सुधारणा टिकून राहिली. टोमॅटोची आवक जामनेर, एरंडोल व औरंगाबादमधील सोयगाव आदी भागांतून होत असून, त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. प्रतिदिन ११ क्विंटल आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com