साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे झाली असून, यामुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली आहेत. गेल्या तीन वर्षांत ‘जलयुक्त’मधून १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतील २०१८-१९ मधील कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळग्रस्त गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. निवड झालेल्या गावात सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन आदी कामे हाती घेतली गेली.

२०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २१५ गावांमध्ये ६४७४ कामे निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ८४१८ कामे झाली आहेत. त्यावर १६४ कोटी दोन लाख रुपये खर्च झाले. २०१६-१७ मध्ये २१० गावांमध्ये ५६६५ कामांचा आराखडा करण्यात आला होता. त्या वर्षी आराखड्याइतकीच म्हणजे ५६६५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर १३९ कोटी २१ लाख रुपये खर्च केले गेले.

२०१७-१८ मध्ये २१० गावांमधील ३३७० कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी २७६३ कामे पूर्ण झाली असून, ४३६ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर ८ कोटी ६१ लाख रुपये खर्च झाले आहेत. ‘जलयुक्‍त’मधून जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली; तसेच २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ९१ गावांची निवड केली असून, या गावातील आराखडे तयार करून कामे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ती सुरू करण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातून खटाव तालुक्‍यातील येरळा, माण तालुक्‍यातील माणगंगा, कोरेगाव तालुक्‍यातील वांगणा, वसना नदी, फलटण तालुक्‍यातील बाणगंगा या नद्यांवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती; तसेच सर्व नद्यांवर नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पाणीसाठा होण्यासाठी या नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com