नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा हजारांवर कामे पूर्ण

नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा हजारांवर कामे पूर्ण

नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या कामांमुळे पुनर्भरणातून यंदा सुमारे ४५ हजार २४३ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना त्याचा चांगला आधार मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातून यंदा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ६१ कामे पूर्ण झाली असून, त्या कामांवर ८४ कोटी ८७ लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यासह नगरच्या अनेक भागांना सातत्याने दुष्काळासारख्या आपत्तीला सामोरे जावे लागते. त्यामुळे जलसंधारणाची कामे केली जात असलेल्या विविध योजनांचा एकत्रित मेळ घालून राज्यात २०१५ पासून जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. सातत्याने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टॅंकरने पाणीपुरवठा होण्यासह पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी, दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या गावांची या अभियानात निवड करून कामे केली गेली. जिल्ह्यातील सुमारे आठशे गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे केली आहेत. या कामांवर कोट्यवधींचा खर्चही केला. मध्यंतरी जलयुक्त शिवार अभियानातील झालेल्या कामांमुळे पाणीसाठा वाढीला मदतही झाली होती. काही प्रमाणात पाणीटंचाई कमी झाली. मात्र मागील दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीटंचाई पुन्हा गंभीर स्वरूपात वाढली होती. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी नगर जिल्ह्यामध्ये २४१ गावांत ‘जलयुक्त’अंतर्गत ६ हजार २६९ कामांचा आराखडा केला होता. त्यासाठी १८४ कोटी ३७ लाख रुपये खर्च निश्चित केला होता. केलेल्या आराखड्यानुसार कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता दिली. ४ हजार ७५४ कामांच्या निविदा काढल्या. एक हजार कामांना निविदांची गरज पडली नाही. सर्व कामांना कार्यारंभ आदेश देऊन कामे सुरू केली. आतापर्यंत ६०६१ कामे पूर्ण झाली असून, त्या कामांवर ८४ कोटी ८७ लाख रुपये खर्च केले आहेत.

यंदा या अभियानातून २८७५ हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर, ३२९५ हेक्टरवर खोल सलग समतल चर, ४८,०८८ हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंग, २,३५० हेक्टरवर मजगी, ३८१ ठिकाणी मातीलानाला बांधदुरुस्ती, १५७ ठिकाणी सिमेंट नालादुरुस्ती, ८४२ ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात आले. जलस्त्रोतांमधून ६५३ घनमीटर गाळ काढला; तसेच १ साठवण बंधारा केला व ३१५ साठवण बंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे केली. सात ठिकाणी वनतळे घेतली गेली. त्यामुळे याच कामांतून मोठा पाणीसाठा उपलब्ध होत आहे. पावसाने बहुतांश भागाला दिलासा दिला असून, जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांत साठलेले पाणी मुरल्याने सुमारे ४५,२४३ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात आले.   

अशी असेल पाणीसाठ्याची स्थिती (टीसीएम)

  • पाणी साठवण क्षमता ः १,०९,९२७ 
  • बाष्पीभवनाद्वारे कमी होणारे पाणी ः ४९,९१६ 
  • भूजल पुनर्भरण ः ६०,०१०
  • भूजलातील अपेक्षित पाणीसाठा ः ४५,२४३ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com