सरकारने शेतकरी चळवळी दडपल्याः जयाजीराव सूर्यवंशी

जयाजीराव सूर्यवंशी
जयाजीराव सूर्यवंशी

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या असताना फडणवीस सरकारकडून कायद्याचा गैरवापर करून शेतकऱ्यांची आंदोलने चिरडली जात आहेत. आमच्यावर गुप्तहेर सोडले असून, फोन टॅपिंगदेखील सुरू आहे, असे खळबळजनक आरोप किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी केले आहेत.

एक जून २०१७ मध्ये किसान क्रांतीने राज्यव्यापी संप केला होता. त्या वेळी सरकारबरोबर झालेल्या चर्चेत सात एकराच्या आतील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा निर्णय झाला होता. सरकारने दीड वर्षात मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी फसवणूक केली, असे श्री.सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे.  फसवणूक सांगण्यासाठीच आम्ही पुन्हा २६ जानेवारीला सिंदखेडराजा येथी कर्जमुक्ती जागर यात्रा काढली. १९ फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यात्रेचा उद्देश सांगणार होतो. मात्र, पोलिसांनी आदल्या दिवशीच ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले. आंदोलन हाणून पाडले. माझ्या ४० वर्षांच्या आंदोलनाच्या इतिहासात अशी गळचेपी मी अनुभवली नाही, असे ते म्हणाले. 

मुलींचे आंदोलन चिरडले कर्जमुक्तीसाठी वडीलधाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुलींनी पुणतांबा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मात्र, ४०० पोलिसांची फौज आणून सरकारने ते देखील आंदोलन मोडले. गुन्हा नसतानाही शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या वडिलांना पोलिस कोठडीत डांबले. न्यायालयाने या प्रकारावर ताशेरे ओढले आहेत, असे ते म्हणाले. पुणतांब्याचे शेतकरी आंदोलन, एसटी संप, अंगणवाडी कर्मचारी संप, मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, बाबा आढाव किंवा अण्णा हजारे यांचे उपोषण अशी सर्व आंदोलने सरकारने मोडून काढली. खा. राजू शेट्टी व आ. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही. ही अघोषित आणीबाणी आहे. यामुळे चळवळी संपतील. शेतकरी अजून संकटात येईल, असा आरोपही श्री.सूर्यवंशी यांनी केला. 

ओटीएस योजना धूळफेक किसान क्रांतीबरोबर झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी आणि दीड लाखाच्या वरील रक्कम वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) भरल्यास दीड लाखाची माफी देण्याचे सरकारने घोषित केले होते. प्रत्यक्षात कर्ज काढून ओटीएसचे पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना माफी दिली नाही. ही धूळफेक आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे दावे करतात, असाही आरोप श्री. सूर्यवंशी यांनी केला. 

हमीभाव खरेदीबाबत खोटारडेपणा शेतमालाची हमीभावाने खरेदी जात असल्याचे मुख्यमंत्री सांगत असून, त्यातून त्यांचा खोटारडेपणा सिद्ध होतो.  हमीभाव खरेदी केंद्रे उघडली गेली नाही. व्यापारी हमीभावाने घेत नसल्यास सरकारने केंद्र सुरू करायची होती. मात्र, मुख्यमंत्री कोणतीही भक्कम यंत्रणा नसताना खोटे बोलून शेतकऱ्यांना भसवितात, असे श्री. सूर्यवंशी म्हणाले. 

आता ‘व्होट’ रोकोसाठी आंदोलन  रस्त्यावरची सारी आंदोलने मुख्यमंत्री चिरडून टाकत आहेत. त्यामुळे आता आम्ही रास्ता रोको नव्हे तर ‘व्होट’ रोको आंदोलन करणार आहोत. मराठा क्रांती मोर्चासह इतर समविचारी पक्षांशी, संघटनांशी युती करून लोकांना जागृत केले जाईल. खोटारड्या सरकारला मत देऊ नका, असे आम्ही सांगू, असेही श्री. सूर्यवंशी म्हणाले. आंदोलनाचा धसका शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला आहे. त्यामुळे आमच्या मागावर सीआयडी सोडण्यात आले आहेत. आंदोलनाची खडानखडा माहिती पोलिसांना समजते, कारण फोन टॅप केले जात आहेत. महत्त्वाच्या आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिस कोठडीत डांबले जाते. यामुळे राज्याची शेतकऱ्यांच्या चळवळी लवकरच संपुष्टात येतील, अशी भीती श्री. सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com