भूखंड वाटपात २० हजार कोटींचा घोटाळा: जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई नागरी जमीन कमाल धारणा कायद्याच्या कलम २० अन्वये अतिरिक्त घोषित करण्यात आलेली मुंबईतील २ हजार ८०८ हेक्टर जमीन सरकारने बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घालण्याचे काम सुरू केले आहे. यात २० हजार कोटीहून अधिक किमतीचा घोटाळा झाल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सरकारने हजारो कोटी रुपये किमतीची जमीन नाममात्र किमतीत वेगवेगळ्या उद्योगांच्या ताब्यात देण्यास सुरवात केल्याचा दावाही पाटील यांनी केला. विधानसभेत नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायद्यांतर्गत (यूएलसी) अतिरिक्त ठरलेल्या मुंबई ठाण्यातील जमिनीचा मुद्दा उपस्थित करून याप्रकरणी चौकशीची मागणी केली. गेले दोन दिवस पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळे चव्हाट्यावर आणून चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. शुक्रवारी त्यांनी नगरविकास विभागातील संशयास्पद निर्णयावर बोट ठेवले. यूएलसीचा कायदा २००७ मध्ये रद्द झाला असला तरी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सप्टेंबर २०१४ मध्ये मूळ कायद्यातील काही तरतुदी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे कलम तीन अन्वये अतिरिक्त जमीन सरकारकडे यायला हवी. कलम २३ प्रमाणे जमिनीचा व्यावसायिक वापर झाला असेल तर त्यावर कार्यवाही व्हायला हवी. असे असतानाही सरकारने यूएलसीच्या संदर्भात नेमलेल्या श्रीकृष्ण समितीचा अहवाल १६ नोव्हेंबर २०१८ च्या बैठकीत स्वीकारला आणि २ हजार ८०८ हेक्टर म्हणजे ७ हजार २० एकर जमीन परस्पर विकण्याचा सल्ला दिला. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात एमसीएचआयने राज्य सरकारच्या बरोबरीने कन्सेट टर्म दाखल केली. मात्र, याला नेरालॅक वर्कर्स युनियने हरकत घेतल्याने हे प्रकरण अद्याप न्यायप्रिवष्ठ असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यानच्या काळात सरकारने १५ मे २०१९ रोजी ग्लॅक्सो स्मिथ कलाइर्ट फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीला ठाण्यातील पाचपाखाडी येथे २ लाख ६७४ चौरस मीटर जमिनीची विक्री, हस्तांतरण बदल आणि जमीन विकसित करण्यास परवानगी दिली. याप्रमाणे रेमंड, वायमन गार्डन, एल अॅण्ड टी यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर मंजूर झाल्याचे समजते. गोरगरिबांच्या घरासाठी मुंबईत हक्काने राखून ठेवलेली जमीन उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com