सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मुख्यमंत्र्यांनी पाने पुसली : पाटील

राज्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी सरकारवर नाराज आहेत. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देतानाही हे सरकार किती आढेवेढे घेते याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. - जयंत पाटील , प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई  : हे सरकार आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेईल आणि त्याची तयारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या वेतन आयोगाची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. आधी फरक दिला पाहिजे आणि मग त्याची मुख्य रक्कम हजार कोटी आहे ती द्यायची आहे. त्यामुळे जे आश्वासन राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिले आहे, याचा अर्थ त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम हे सरकार करणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

श्री. पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की सातवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने अंमलबजावणी करण्यास बराच उशीर केला आहे. विधानसभेतही मी सांगितले होते, की राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर अमूक एक देत असल्याचे सांगेल आणि देत असताना त्यातला थोडासा टक्का किंवा एक भाग देईल आणि तशीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात सातव्या वेतन आयोगाचे पैसे देण्यास सुरवात करू, असे जाहीर केले आहे याचा अर्थ असा, की राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे देण्याची सरकारची इच्छा नाही. बहुधा एप्रिल-मेमध्ये निवडणुका होणार असल्याने त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आम्ही तुम्हाला दिलं’ असं सांगतील आणि पाच किंवा सात टक्केच रक्कम राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्यास सुरवात केली जाईल, अशी टीकाही श्री. पाटील यांनी केली.

महागाई भत्ता मिळवण्यासाठीसुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. आता तर नवा फतवा काढला आहे, की नवीन योजना तुम्हाला घ्यायची असेल तर २५ टक्के कर्मचारी कमी करण्याची तजवीज करून तुम्ही नवी योजना सादर करा. याचा अर्थ राज्यात ठेकेदारी पद्धत राबवून सरकारला कर्मचारी घ्यायचे आहेत. असं एक नवं धोरण म्हणजे स्वस्तातील कर्मचारी राबवून ठेकेदारी पद्धतीला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकारची आहे, असा थेट आरोप श्री. पाटील यांनी केला. दरम्यान, बुधवारी (ता.८) दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच  होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com