सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी, वेळेचे नियोजन करा ः जयंत पाटील

jayant patil
jayant patil

मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात योग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊन सिंचन क्षमतेत वाढ होईल, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २४) दिले. मंत्रालयात विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू व विभागाचे प्रधान सचिव इ.सिं. चहल, सचिव लाभक्षेत्र राजेंद्र पवार, सचिव प्रकल्प समन्वयक संजय घाणेकर आदी उपस्थित होते. राज्यातील निर्मित सिंचन क्षमता जून २०१९ अखेर ५३ लाख २० हजार हेक्टर आहे. तसेच निर्मित पाणीसाठा ४४०४० दशलक्ष घनमीटर इतका आहे. लागवडीलायक क्षेत्र २२५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. राज्यात एकूण ३२४९ सिंचन प्रकल्प पूर्ण आहेत. यात ३१ मोठे १९२ मध्यम तर ३०२६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. त्याप्रमाणे बांधकामाधिन असे ३१३ प्रकल्प असून यात ६३ मोठे ७८ मध्यम व १७२ लघू प्रकल्प असल्याची माहिती प्रधान सचिवांनी दिली. तसेच जलसंपदा व लाभ क्षेत्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांचे संगणकीय सादरीकरण केले. या वेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, नाशिक येथील निरीचे महासंचालक नागेंद्र शिंदे आदींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. ‘जल साक्षरता’ शालेय अभ्यासक्रमात घेऊ ः बच्चू कडू जल साक्षरता हा विषय शालेय अभ्यासक्रमापासून विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शालेय अभ्यासक्रमात हा विषय घेण्याचा प्रयत्न करू. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्येही अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करता येईल का हे पाहिले जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. सिंचन प्रकल्प राबविताना कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही. त्यांच्या जमिनींचा योग्य मोबदला त्यांना मिळेल याकडे विभागाने दक्षतेने पाहावे, अशी सूचना राज्यमंत्र्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com