जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९०० रुपये प्रतिगाठीने तयार

आर्द्रता व ट्रॅश या अटी वगळून जिनिंग व्यावसायिक ९०० रुपये प्रतिगाठ या दरात सीसीआयचे खरेदी केंद्र आपल्या जिनिंग व प्रेसिंग कारखान्यात सुरू करण्यास तयार आहेत. मागील वर्षी सीसीआयने ७८५ रुपये प्रतिगाठ, असे दर दिले होते. यंदा वीजदर २५ टक्के अधिक आहेत. इतर खर्च वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता ९०० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे. - अविनाश काबरा, महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन
कापूस खरेदी
कापूस खरेदी

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीचा तिढा मध्य प्रदेश, महाराष्ट्रात कायम आहे. जिनर्सनी कुठल्याही अटी व शर्तींशिवाय ९०० रुपये प्रतिगाठ (एक गाठ १६० किलो रुई) या दरात सीसीआयचे केंद्र आपल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात सुरू करण्याची तयारी केली आहे. परंतु सीसीआयने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. सीसीआयने अटी व शर्तींशिवाय ८०० रुपये प्रतिगाठ असे दर देऊ, अशी भूमिका मांडली आहे.  सीसीआयची खरेदी देशात फक्त तेलंगण व आंध्र प्रदेशात सुरू आहे. आंध्र प्रदेशात मागील महिन्यात केंद्र सुरू झाले. तेथे अडीच टक्के ट्रॅश व आठ टक्के आर्द्रता या अटी जिनर्सनी स्वीकारल्या आहेत. या अटींचे पालन करून ११२५ रुपये प्रतिगाठ या दरात कापसाची जिनिंग व प्रेसिंग करायची कार्यवाही तेथे सुरू झाली आहे.  राज्यात महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने अडीच टक्के ट्रॅश व आठ टक्के आर्द्रता या अटी वगळल्या जाव्यात. या अटी वगळल्या तर जिनर्स कापसाची जिनिंग व प्रेसिंग ९०० रुपये प्रतिगाठ (एक गाठ १६० किलो रुई) या दरात करायला तयार असल्याचा प्रस्ताव सीसीआयला दिला आहे. त्यावर सीसीआयने अटी व शर्तींशिवाय ८०० रुपये प्रतिगाठ असा दर देऊ, अशी भूमिका जिनर्ससमोर मांडली आहे. परंतु जिनर्सनी ८०० रुपयांचे दर नामंजूर केले आहेत.  तिढा कायम असल्याने सीसीआय व जिसर्नमध्ये खरेदी केंद्र सुरू करायचे करार पूर्ण झालेले नाहीत. मध्य प्रदेशात सात वेळेस खरेदी केंद्रांसाठी सीसीआयने निविदा काढल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. तेथेही कापूस खरेदी ठप्पच आहे.  खुल्या बाजारात येण्याची तयारी सीसीआय लवकरच जिनर्सच्या भूमिकेसंबंधी विचारविनियम करून निर्णय जाहीर करणार आहे. सध्या मध्य भारतात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक आहेत. ही बाब लक्षात घेता सीसीआय खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदीची तयारी करीत आहे. खुल्या बाजारात जे दर असतील, त्या दरात सीसीआय खरेदी करील. राज्यात मराठवाडा व खानदेशात (नगर, नाशिकसह) येत्या २० नोव्हेंबरनंतर सीसीआय खुल्या बाजारात कापूस खरेदीची कार्यवाही सुरू करील, अशी माहिती मिळाली आहे. येत्या २० तारखेपर्यंत सीसीआय खरेदीचे करार करील. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील जिनर्सची दरांची मागणी लक्षात घेता मार्ग काढण्यासंबंधी सीसीआयच्या वरिष्ठ कार्यालयात हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.  सध्या ओलावा अधिक सध्या पूर्वहंगामी व कोरडवाहू कापसात थंड व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे किमान नऊ टक्के आर्द्रता येत आहे. तसेच दर्जेदार कापसातही साडेतीन टक्‍क्‍यांपर्यंत ट्रॅश (कचरा) येतो. नऊ टक्के आर्द्रता व साडेतीन टक्के ट्रॅशच्या गाठी परदेशात निर्यातीसाठी चालतात. त्यांना दर्जेदार गाठी म्हणून चांगले दरही मिळतात. सीसीआयला आपल्या निकषानुसार सध्या राज्यात अपवाद वगळता कुठेही कापूस मिळणार नाही, असे जिनर्सचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com