शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून जुगाडपर्यंत सफर

पुणे : ‘कृषिक २०२१’ निमित्ताने बारामतीच्या शारदानगरचा परिसर हजारो शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून जुगाडपर्यंत सफर
शारदानगरमध्ये आयआयटी तंत्रापासून जुगाडपर्यंत सफर

पुणे : ‘कृषिक २०२१’ निमित्ताने बारामतीच्या शारदानगरचा परिसर हजारो शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आयआयटीच्या तंत्रज्ञांपासून ते प्रयोगशील शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या जुगाडपर्यंतच्या विविधांगी कृषी तंत्रे, यंत्रे आणि पीक प्रात्यक्षिके पाहून शेतकरी भारावून जात आहेत. 

गेल्या पाच वर्षांपासून सतत वेगळी ‘थीम’ घेत बारामती कृषी प्रदर्शनातून आधुनिक शेतीची शिदोरी वाटली जाते आहे. रोज ८ ते १० हजार शेतकरी प्रदर्शनाला हजेरी लावत आहेत. शनिवारी सहाव्या दिवशी ही गर्दी आणखी वाढली. 

कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही प्रदर्शनाला हजेरी लावली. ‘शेतकऱ्यांना मौल्यवान माहितीचे धडे देणाऱ्या या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला यशस्वी करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न प्रशंसनीय आहेत,’ अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. यंदा राज्यासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तमिळनाडू व उत्तर प्रदेशातूनही शेतकरी प्रदर्शनात आले. 

शेतीमधील स्टार्टअप्सचं स्वतंत्र दालन यंदाचे वैशिष्ट्य आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांनी सुरू केलेले स्टार्टअप्स व त्यातून शोधलेली उपकरणं, अवजारे या ठिकाणी आहेत. यात मोटरसायकल ट्रॉली, कृत्रिम रेतन उपकरण, सेन्सर्स आदींचा समावेश आहे. आनंद शर्मा, शैलेंद्र तिवारी यांच्यासारख्या आयआयटी तंत्रज्ञांनी शोधलेले फसल सेन्सर्स तसेच बॅटरीवर चालणारे कांदा कापणी यंत्र, छोटी माती चाचणी प्रयोगशाळा, ५० जनावरांचे आवाज काढणारा सौर ‘खेती रक्षक’ तसेच छोट्या अवजारांचे, ‘मंडी प्लॅटफॉर्मस्’चे कक्ष शेतकऱ्यांची लक्ष वेधून घेत आहेत. 

उच्च तंत्रज्ञानातून साकारलेली फुले व भाजीपाला लागवडीची प्रात्यक्षिके, ‘आयसीएआर’च्या मदतीने भरडधान्याची संपूर्ण मूल्य साखळी दाखविणारा भरडधान्य महोत्सव प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. गादी वाफा पद्धतीने तसेच इस्राईल पद्धतीने मोसंबी लागवड, हळद बिजोत्पादन, फळपिकांचे मातृवृक्ष, ऊस रोपवाटिका, मधुमक्षिका पालन, आवळा शेती, मत्सशेती, नेदरलॅंड तंत्रज्ञानावर आधारित स्वनियंत्रित हरितगृह, भाजीपाला गुणवत्ता नियंत्रण केंद्र शेतकऱ्यांच्या उत्सुकतेचे केंद्र ठरले आहे. ‘भीमथडी जत्रे’लाही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार स्वतः प्रदर्शनात फिरून शेतकऱ्यांची मतं जाणून घेताना दिसतात. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश नलावडे यांनी प्रदर्शनाला ‘बचत गट ते बहुराष्ट्रीय कंपनी’ असा लूक येण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर, ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. रतन जाधव यांच्या ‘टीम’ने अनेक पीक व यंत्र प्रात्यक्षिकांनी या परिसराला सजविले आहे. 

‘अॅग्रोवन मार्ट’ बघण्यासाठी रांगा 

राज्यात ५०१ ठिकाणी यंदा ‘अॅग्रोवन मार्ट’ उभी राहतील. ही संकल्पना समजावून घेण्यासाठी प्रदर्शनात उभारलेल्या भव्य ‘अॅग्रोवन मार्ट’ला भेट देण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मार्टमध्ये २५ कंपन्यांची २५० उत्पादने उपलब्ध आहेत.    जोखीम आमची; यश शेतकऱ्यांचे 

“शेतकरी स्वतः सतत फिरतात आणि तंत्र, माहिती गोळा करून गावशिवारात एकटे प्रयोग करतात. मात्र, अशा प्रयोगांवर आधारित शेती करताना यश न मिळाल्याने त्यांचे नुकसान होते. जोखिमयुक्त शेतीचे असे प्रयोग शेतकऱ्यांनी स्वतः करण्यापेक्षा आम्ही (बारामती ‘केव्हीके’ने) करावेत. त्यातील फायदेशीर कृषितंत्र नंतर थेट शेतकऱ्यांनी उचलाव्यात. प्रदर्शनाच्या रूपाने आमचे व बाहेरील संस्थांचे यशस्वी तंत्र पाहून शेतकरी स्वतः आत्मविश्वासाने शेतीत उतरतात. ते शेतीत यशस्वी होत असल्याचे पाहून समाधान वाटते.”  - राजेंद्र पवार, अध्यक्ष, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट    आज समारोप  

शेतकऱ्यांना जगभरातील कृषी तंत्रज्ञान पाहण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. बारामती-शारदानगर येथील कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचा आज (ता. २४) सायंकाळी समारोप होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com