ज्वारी पीक लष्करी अळीच्या धोक्‍याबाहेर

ज्वारी पीक लष्करी अळीच्या धोक्‍याबाहेर
ज्वारी पीक लष्करी अळीच्या धोक्‍याबाहेर

जळगाव  ः खानदेशात संकरित ज्वारी, दादर पीक अमेरिकन लष्करी अळीच्या धोक्‍याबाहेर आहे. पिकाची स्थिती बऱ्यापैकी आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची निसवण झाली आहे. परंतु ढगाळ वातावरणासह सुसाट वाऱ्यामुळे या पिकाला काहीसा फटका बसत आहे. कोरडवाहू ज्वारीची काढणी पुढील १५ ते २० दिवसानंतर अनेक भागात सुरू होईल, असे चित्र आहे.  दादर ज्वारीवर सुरुवातीला खोडकीड होती. यानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या व हे संकट दूर केले. मध्यंतरी काही भागांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप दादर ज्वारी व संकरित प्रकारच्या ज्वारीवर झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. नंतर या अळीचाही अटकाव झाल्याचे सांगण्यात आले. दादर ज्वारी व संकरित ज्वारीची पेरणी यंदा अधिक झाली आहे. जलसाठे तापी, गिरणा, वाघूर, पांझरा, अनेर, सुसरी, गोमाई आदी नद्यांच्या क्षेत्रात मुबलक असल्याने पेरणी यंदा वाढली असून, खानदेशात मिळून सुमारे २८ हजार हेक्‍टरवर दादर ज्वारी व संकरित ज्वारीची पेरणी झाली आहे. तापी, गिरणा काठच्या काळ्या कसदार जमिनीत उडीद, मूग, सोयाबीनचे क्षेत्र रिकामे होताच शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची पेरणी केली होती. हे पीक जोमात असून, निसवले आहे. त्यात दाणे भरत असून, पुढील आठवड्यात पक्ष्यांपासून संरक्षणासाठी देखील शेतकऱ्यांना उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दादर ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रातील सर्वाधिक पेरणी चोपडा, यापाठोपाठ जळगाव, अमळनेर, पाचोरा या तालुक्‍यांमध्ये झाली आहे. या भागातील काळ्या कसदार जमिनीत हे पीक असल्याचे सांगण्यात आले.  पिकाची वाढ चांगली झाली आहे, परंतु मागील आठ ते १० दिवसांपासून खानदेशात ढगाळ वातावरण आहे. सकाळी व दुपारी सुसाट वारा सुटतो. यात निसवलेल्या ज्वारीमध्ये अंशतः नुकसान होत आहे. पीक आडवे होण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी मात्र धसका घेतला आहे. दादरची वाढ पाच ते सहा फुटांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे सकस चाराही शेतकऱ्यांना मिळेल. अनेक शेतकरी या आठवड्यात पिकामध्ये सिंचन करण्याचेदेखील नियोजन करीत आहेत. कारण सिंचन केल्यानंतर दाणे जोमात भरतील. तसेच चाराही अधिकचा मिळू शकेल. दादर, संकरित ज्वारीच्या कडब्याला मोठा उठाव खानदेशात असतो. यामुळे कसदार चाराही उत्पादनासंबंधी शेतकरी कार्यवाही करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com