वाट चुकलेले गवे; धास्तावलेले शेतकरी
वाट चुकलेले गवे; धास्तावलेले शेतकरी

वाट चुकलेले गवे; धास्तावलेले शेतकरी

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : तालुक्‍यात २००६ मध्ये हत्तींचे आगमन झाले. महिनाभराच्या वास्तव्यानंतर हत्ती माघारी गेले. हत्तींच्या आगमनाची तपपूर्ती झाली असतानाच आता ऊस पट्ट्यात गवे दाखल होत आहेत. नुकतेच शहराच्या वेशीत गवे येऊन गेले. कळपातून चुकलेले दोन गवे काही तासांपुरते हिरण्यकेशी काठावरील ऊस पट्ट्यात धुडगूस घालून गेले असले, तरी पुन्हा त्यांच्या आगमनाची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

गडहिंग्लज तालुक्‍याचा बहुतांशी भाग पाण्याने संपन्न आहे. यामुळे पिकांची हिरवाई सर्वांचेच लक्ष वेधून घेते. त्याला वन्यप्राण्यांचाही अपवाद नाही. तालुक्‍यातील महागाव, मासेवाडी, तारेवाडी, हडलगे, तेगीनहाळ, बुगडीकट्टी, नौकूड, कडाल आदी भागात काहीसे जंगल क्षेत्र आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच गव्यांची वर्दळ आहे; परंतु हिरण्यकेशी नदीकाठावरील ऊस पट्ट्यात कधीच गव्यांचे दर्शन घडले नाही. किल्ले सामानगड परिसरातील नौकूड जंगल विरळ झाले आहे. यामुळे तेथील गव्यांचा कळप इकडे-तिकडे झाला. याच कळपातील चुकलेले दोन गवे किल्ला उतरून चिंचेवाडी आणि भडगावच्या गुड्डाई डोंगरामार्गे जरळी गावच्या हद्दीतील शेतवडीत घुसले. तेथून नदीकाठानेच ते गडहिंग्लजच्या वेशीतून येत गडहिंग्लज-चंदगड मार्ग ओलांडला आणि पश्‍चिमेच्या दिशेने गवे रवाना झाले. कळपातून चुकून हे गवे ऊस पट्ट्यात आले असले, हीच खबरदारी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

महिन्याभरात १८ ठिकाणी जंगलाजवळ आगी लागल्या. पुढे १० ते १२ ठिकाणी गव्यांचे कळप मानवी वस्तीत आले. यात चार दिवसांपूर्वी कधीही गवे न दिसलेल्या पेठवडगाव ते लाटवडे भागात त्यांचा एक कळप आला. गगनबावड्यात व चंदगडात हेरे गावच्या मुख्य रस्त्यावर गव्यांचा वावर आहे. आजरा, चंदगड भागांतील गवे थेट गडहिंग्लजमधील रस्त्यावर आले आहेत. आंबा, पन्हाळ्याच्या बाजूला गिरोली जंगलाभोवतीच्या शेतीत गव्यांचा वावर वाढला आहे. जिल्ह्यात दहा ठिकाणी मानवी वस्तीजवळ गव्यांचा वावर वाढला आहे. 

महिन्याभरात आजरा, गगनबावडा, बाजारभोगाव, पन्हाळा, आंबा या परिसरांत जंगली वणवे लागल्याने त्याची धग वाढली. ज्या भागात गव्यांचा वावर नित्याचा आहे, त्या भागातील गव्यांचे स्थलांतर झाले आहे.

जंगलाबाहेर आलेल्या गव्यांचा वावर नदी आणि तलावाकाठी जास्त प्रमाणात आहे. उसाची तोड झाल्याने शेती रिकामी झाली आहे. त्यामुळे गवे सहजपणे नजरेत येतात. अवती भोवतीचे वातावरण गव्यांना जंगलापेक्षा वेगळे दिसल्याने गवे झाडीच्या भागाकडे जातात. वन विभाग त्यांना सुरक्षितपणे जंगलाकडे घालवतो; मात्र अनेकदा लोक गर्दी करीत गव्यांच्या मागे धावतात हे धोकादायक आहे.  - डी. एच. पाटील, वनपाल.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com