थंडी, ऊन आणि अवकाळीने ‘जुन्नर हापूस’ धोक्‍यात

थंडी, ऊन आणि अवकाळीने ‘जुन्नर हापूस’ धोक्‍यात
थंडी, ऊन आणि अवकाळीने ‘जुन्नर हापूस’ धोक्‍यात

पुणे ः फेब्रुवारीत आलेली थंडीची लाट, नंतर वाढलेल्या तापमानामुळे मोहोर जळाला आणि त्यानंतर रविवारी (ता. १४) झालेल्या अवकाळी पावसाने कैऱ्यांची झालेली गळ, अशा विविध टप्प्यांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे यंदा जुन्नर तालुक्‍यातील हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर यंदा केवळ ३० ते ३५ टक्केच उत्पादन होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. 

जुन्नर तालुक्‍यात हापूसचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यात हापूस, राजपुरी आणि केशर वाणाची सुमारे ८५० हेक्‍टरवर लागवड आहे. यापैकी प्रमुख क्षेत्र हे तालुक्‍याच्या पश्‍चिम घाट परिसरात असून यामध्ये काले, येणेरे, बेलसर, निरगुडे, बोतार्डे, शिंदे, राळेगण, तांबे, धालेवाडी, वडज, कुसूर, पारुंडे, माणिकडोह या परिसरात असून, हा परिसर ‘जुन्नर हापूस’चे आगर म्हणून ओळखले जाते. या परिसरात सुमारे ३०० हेक्‍टर क्षेत्रावर विविध वाणांची लागवड आहे. 

या परिसरातील हापूस मुंबई बाजार समितीमध्ये जुन्नर हापूस म्हणून विक्री होते. कोकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर साधारण जून महिन्यात जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरवात होते. कोकणातील हापूस एवढाच दर या आंब्याला मिळत असल्याने हा हंगाम विशेष समजला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी सुरवातीला आंब्याला मोहोराचे प्रमाण अधिक होते. मात्र, ९ व १० फेब्रुवारी रोजी निर्माण झालेल्या अतिथंडीमुळे फळधारणेच्या अवस्थेवर गंभीर परिणाम झाला. मोहोर गळून पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या हवामानातून शेतकरी सावरत नाही तोच मार्च, एप्रिलमध्ये वाढलेले तापमान व उन्हाच्या तीव्र झटक्‍यामुळे बेरिंग अवस्थेतील असणाऱ्या कैऱ्या गळण्याचे प्रमाण वाढले होते. तर नुकत्याच रविवारी (ता. १४) झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्याने ७० टक्के नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मावळ, मुळशीमध्येही फटका  जुन्नरप्रमाणेच मावळ, मुळशी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणावर हापूस, केशरची लागवड आहे. हा परिसरदेखील पश्‍चिम घाटमध्ये असून, या परिसरातदेखील समान वातावरण होते. याचा परिणामदेखील आंबा उत्पादनावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जूनमध्ये पुणे बाजार समितीमध्ये स्थानिक आंब्याचा हंगाम सुरू होतो. यंदा हा हंगामदेखील ५० टक्केच होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

यंदा फेब्रुवारीमधील अतिथंडीनंतरचे मार्च, एप्रिलमधील अति तापमान यामुळे मोहोराबरोबर फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली, त्यातच रविवारी (ता. १४) झालेल्या वादळी पावसामुळे लिंबाच्या आकाराच्या कैऱ्यादेखील झडल्या गेल्या, यामुळे यंदा केवळ ३० टक्केच उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. - बाजीराव ढोले, जुन्नर हापूसचे पांरपरिक उत्पादक, रा, येणेरे, ता. जुन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com