सिंधुदुर्गातही `कडकनाथ`प्रकरणी गुन्हा दाखल

कडकनाथ
कडकनाथ

सिंधुदुर्ग: कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ हून अधिक शेतकऱ्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांच्या वतीने कुडासे (ता. दोडामार्ग) येथील आत्माराम महादेव मेस्त्री यांनी दोडामार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.  इस्लामपूर (जि, सांगली) येथील रयत ॲग्रो इंडिया आणि महारयत ॲग्रो इंडिया या कंपनीकडून जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना कुक्कुटपालनातून आर्थिक समृद्धीचे स्वप्न दाखविले. कुक्कुटपालन करण्याची संधी निर्माण करून देत असल्याचे भासविले. याशिवाय मत्स्यशेती, शेळीपालन या व्यवसायासाठीदेखील योग्य प्रशिक्षण देण्याचे कंपनीने शेतकऱ्यांना सांगितले होते. कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिले, कोंबडीचे खाद्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन कंपनी पुरविणार होती. अंडी किंवा कोंबडी तयार झाल्यानंतर चांगल्या दराने कंपनी खरेदी करणार होती. खरेदीची हमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. कंपनीकडे भरलेली रक्कम २५ लाख रुपये असली तरी, पोल्ट्रीकरिता आवश्‍यक असलेले शेड उभारणे यासह अन्य खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून केला.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या कंपनीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत फसवणूक केल्याचे उघड झाले. कंपनीच्या काही संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यामुळे या व्यवसायात गुंतवणूक केलेले येथील शेतकरी खडबडून जागे झाले. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. आत्तापर्यंत २६ शेतकऱ्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. हे सर्व शेतकरी दोडामार्ग तालुक्यातील आहेत. या शेतकऱ्यांच्या वतीने कुडासे येथील आत्माराम महादेव मेस्त्री यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एकाच तालुक्यातील एवढे शेतकरी असून, जिल्ह्यात आणखी काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com