कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात 

गतवर्षी कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मोठा फटका बसला. तसेच यंदा ही आता आधी बागा न फुटणे, त्यानंतर वादळ, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आणि उत्पादित मालाला खर्च आणि दरवर्षीच्या तुलनेत न मिळणारे दर यामुळे द्राक्ष उत्पादक चांगलेच घायकुतीला आले आहेत.
Bitter grape depot at a loss
Bitter grape depot at a loss

जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख असलेल्या कडवंचीचे द्राक्ष उत्पादक यंदाही तोट्यातच आहेत. गतवर्षी कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मोठा फटका बसला. तसेच यंदा ही आता आधी बागा न फुटणे, त्यानंतर वादळ, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आणि उत्पादित मालाला खर्च आणि दरवर्षीच्या तुलनेत न मिळणारे दर यामुळे द्राक्ष उत्पादक चांगलेच घायकुतीला आले आहेत. 

जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारातील द्राक्ष शेतीचा नंदापूर, नाव्हा, वरुड, धारकल्याण, पीरकल्याण, बोरखेडीसह १० ते १५ गावांत विस्तार झाल्याने या सर्व गावांमध्ये मिळून सुमारे ५००० एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर व दर्जेदार द्राक्ष उत्पादनामुळे या शिवाराची ख्याती आहे. गतवर्षी कोरोना संकटामुळे ऐन मार्च महिन्यात लागलेल्या लॉकडाउनमुळे या परिसरातील बहुतांश द्राक्ष उत्पादकांना ५ ते १० रुपये प्रतिकिलो इतक्‍या कवडीमोल दराने शेतकऱ्यांना द्राक्ष विकण्याची वेळ आली होती. 

या संकटातून सावरून पुन्हा यंदाच्या द्राक्ष उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असतानाच छाटणीच्या काळात ऑक्‍टोबरमध्ये आलेल्या अती पावसाने घात केला. वेलीमध्ये अन्नसाठाच होऊ न शकल्याने घडनिर्मिती झाली नाही. जे घड निघाले ते कमकुवत निर्माण झाल्याने जागीच जिरले. जवळपास ७० टक्‍के बागा फुटल्याच नाही. प्रतिकूल वातावरणातून द्राक्षाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना होणाऱ्या एकूण उत्पादकांपैकी १० ते २० टक्‍केच द्राक्ष घड हाती आले. ८० ते९० टक्‍के शेतकऱ्यांना १० ते २० टक्‍क्‍यांपुढे उत्पादन घेता आले नसल्याचे शेतकरी सांगतात. 

उत्पादकतेत फटका बसलेल्या द्राक्ष उत्पादकांना गारपिटीचाही फटका बसला. गारपिटीसह विविध कारणांमुळे कडवंची शिवारातील ४३५ हेक्‍टरवरील द्राक्ष बागांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल संयुक्‍त पाहणीतून प्रशासनाला कळविण्यात आला आहे. आजच्या घडीला शेतकऱ्यांना जिथे किमान ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचे दर मिळण्याची अपेक्षा असते, तिथे २० ते २५ रुपये प्रतिकिलोच्या दरावर शेतकऱ्यांना समाधान मानन्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. दरवर्षी या शिवारात ठाण मांडूण बसणारे व्यापारीही यंदा त्यांना अपेक्षित माल बागेनिहाय मिळत नसल्याने शिवारात फिरकत नसल्याचे शेतकरी सांगतात. 

दरवर्षी द्राक्ष बागेचे संगोपन करण्यासाठी उत्पादकांचा साधारणत: एकरी जिथे सव्वा ते दीड लाख खर्च होतात. तिथे यंदा हा खर्च निसर्गाच्या प्रतिकूल स्थितीमुळे २ लाखांपर्यंत गेला. खर्च करून त्या तुलनेत एकरी किमान १५० क्‍विंटल उत्पादन येणे अपेक्षित असताना उत्पादनात निम्मी घट झाली. ते एकरी ७० ते ८० क्‍विंटल एकरीवरच लटकले. काही मोजक्‍या बागेत उत्पादन शंभर क्‍विंटलपुढे गेले. त्यापैकी बहुतांश बागांना गारपिटीचा फटका बसल्यामुळे त्या द्राक्षांना कवडीमोल विकण्याची वेळ आली. या सर्व संकटातूनही ज्या बागेत बरे उत्पादन मिळाले त्या द्राक्षांना पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे उद्‌भवलेल्या कोरोना संकटामुळे कोणी विचारेना. त्यामुळे बळंच ही द्राक्ष २० ते २५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ आली. होणारा खर्च होऊन बसला. मात्र उत्पन्न न मिळाल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 

२० एकर द्राक्ष बागेपैकी केवळ ४ एकर बागेत उत्पादन मिळणार होते. त्यापैकी तीन एकर बाग गारपिटीत सापडली. एका एकरात दीडशे क्‍विंटल उत्पादन मिळाले. तर ते द्राक्ष लॉकडाउनमुळे कुणी व्यापारी फिरकत नसल्याने २२ रुपये प्रतिकिलोने विकून मोकळा झालो. अनेकांना उधारीवर आणलेल्या खत, औषधाचे पैसे चुकवायला पैसे नाहीत.  - संदीप क्षीरसागर,  द्राक्ष उत्पादक, कडवंची 

विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. ज्यांनी उतरविला त्यामध्ये गारपिटीसाठी जास्तीची रक्‍कम भरून विमा उतरविणाऱ्यांची संख्या नसल्यात जमा आहे. त्यामुळे सारी आशा शासनाच्या मदतीवर आहे.  - राजेश क्षीरसागर,  द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com