जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा बाजारातून कापूस वगळण्याच्या मागण्यांवरील वस्त्रोद्योग मंत्रालयाची सोमवारी (ता.१७) नियोजित बैठक स्थगित झाली. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सोमवारी सायंकाळी सूत, कापूस निर्यातीसंबंधी निर्यातीत कार्यरत देशातील संस्थांशी व्हर्च्युअल बैठक (व्हीसी) घेऊन चर्चा केली. व्हीसीमध्ये कापूस, सूत निर्यातीला मिळणारा आधार, आवश्यक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत कॉटन, टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसील) व इतर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व्हीसीच्या माध्यमातून सहभागी झाले. या बैठकीत कापूस, कापड, सूत निर्यातीवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच कापूस दरांचाही आढावा घेण्यात आला. व्हीसीमध्ये कापूस निर्यात, आयात शुल्क, वायदा बाजार हे मुद्दे बैठकीत चर्चेसाठी घेतले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मुद्यांवरील मुख्य बैठक येत्या ३१ जानेवारी रोजी होईल, अशीही माहिती मिळाली आहे.
वित्त मंत्रालयाशीही चर्चा वस्त्रोद्योग मंत्रालयाने सोमवारी सुरुवातीला वित्त मंत्रालयाशी कापसावरील आयात शुल्क व इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. त्यात हे शुल्क कपातीनंतर होणारी स्थिती, वित्तीय बाबींवर चर्चा झाली. हे शुल्क रद्द करण्याबाबत मात्र वित्त मंत्रालयाने निर्णय घेतला नाही. यानंतर कापसावरील आयात शुल्क, वायदा बाजारातून कापूस वगळण्यासंबंधीची बैठक टाळण्यात आली, अशीही माहिती मिळाली आहे. ही बैठक आता ३१ रोजी घेतली जाईल. या बैठकीत झालेले निर्णय नंतर केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले जातील किंवा त्या बाबतची घोषणा या अधिवेशनात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रतिक्रिया
वस्त्रोद्योग मंत्रालयाची कापूस आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा बाजारातून कापसाला वगळण्याच्या मुद्द्यावरील मुख्य बैठक सोमवारी झाली नाही. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी कापूस, सूत, कापड निर्यातदारांशी व्हीसीद्वारे चर्चा केली. कापूस आयात शुल्क व इतर मुद्यांवरील घोषणा आता थेट केंद्रीय अर्थसंल्पातच वस्त्रोद्योग मंत्रालय करील, असे मला वाटते. - उज्ज्वल लाहोटी, माजी अध्यक्ष, टेक्सप्रोसील (केंद्र सरकार पुरस्कृत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.