कर्मयोगी गाडगेबाबांच्या स्मारकाचा सत्ताधाऱ्यांना विसर

Forget the rulers government of Karmayogi Gadgebab's monument
Forget the rulers government of Karmayogi Gadgebab's monument

अमरावती ः शेंडगाव येथील कर्मयोगी गाडगे महाराजांच्या स्मारकाचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही सोयीस्कर विसर पडल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. गाडगेबाबांचे जन्मगाव असलेल्या शेंडगाव विकासाकरिता १८.५९ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. परंतु निधीची तरतूद नसल्याने हे काम अडकून पडले आहे. 

तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या कार्याचा गौरव केला होता. सद्यःस्थितीत मात्र राज्यात वेगवेगळ्या स्मारकांसाठी निधी आणि जागांच्या उपलब्धतेची चर्चा होत असतानाच राष्ट्रसंतांच्या जन्मगावाच्या विकासाचा मुद्दा मात्र अडगळीत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. 

शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी तर ऋणमोचन कर्मभूमी आहे. बाबांचे समाधिस्थळ गाडगेनगर येथे आहे. जन्म झाल्यानंतर लहानपण गाडगेबाबांनी शेंडगावात घालविले. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मूर्तिजापूर (अकोला) तालुक्‍यातील दापुरा येथे आईसोबत मामाकडे आसरा घेतला. त्यानंतरच्या काळात कर्मयोगी गाडगेबाबांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरांविरोधात जागर केला. 

ग्रामस्वच्छतेचे महत्त्व देखील त्यांनी गावागावात पोचविण्याचे काम केले. गरिबांसाठी अनेक ठिकाणी अनाथाश्रम, आश्रमशाळादेखील काढल्या. त्याच गाडगेबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासाचा मुद्दा राज्यकर्त्यांना मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विसर पडल्याचीच स्थिती आहे. गाडगेबाबांचे जन्मगाव म्हणून पर्यटकांनादेखील या गावाविषयी उत्सुकता आहे. परंतु, गावात गेल्यानंतर त्यांचा पुरता भ्रमनिरास होतो. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या गावाला भेट दिली होती. त्या वेळीदेखील विकास आराखड्यातील कामे करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.

काय आहे विकास आराखड्यात शासनाने विकास आराखड्याच्या नावावर १८ एकर जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली आहे. या जागेवर सभागृह, भक्‍तनिवास, गाडगेबाबा स्मृती केंद्र अशी अनेक कामे प्रस्तावित आहेत. जागा हस्तांतरावरच हे काम थांबले असून, निधीची तरतूद मात्र करण्यात आली नसल्याने गेल्या अनेक वर्षांत हे काम पुढे सरकलेच नाही. भुलेश्‍वरी नदीच्या काठावर हे साकारण्यात येणार असल्याने पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com