पंढरपुरात आज कार्तिकीचा सोहळा 

कोरोनामुळे गत सुमारे वीस महिन्यांच्या कालावधीत आलेल्या आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द झाल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा प्रथमच सोमवारी (ता. १५) कार्तिकी वारीचा सोहळा होणार आहे.
Karthiki ceremony in Pandharpur today
Karthiki ceremony in Pandharpur today

सोलापूर : कोरोनामुळे गत सुमारे वीस महिन्यांच्या कालावधीत आलेल्या आषाढी आणि कार्तिकी वारी रद्द झाल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंदा प्रथमच सोमवारी (ता. १५) कार्तिकी वारीचा सोहळा होणार आहे. परंपरेप्रमाणे सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.  यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. पण तुलनेने वारकऱ्यांची संख्या कमीच आहे. बऱ्याच कालावधीनंतर पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. चंद्रभागा नदीसह शहरातील विविध धर्मशाळा, मठ आणि मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू आहे. काही ठिकाणी कीर्तने आणि प्रवचनेही सुरू आहेत. आज एकादशीच्या आदल्या दिवशीचे दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने पहाटेपासूनच चंद्रभागातिरी वारकऱ्यांची रीघ दिसून आली. त्या शिवाय मंदिर आणि परिसरासह प्रदक्षिणा मार्गावरही वारकऱ्यांचा अखंड नामघोष सुरू आहे. 

तासाला अडीच हजार वारकऱ्यांना मिळणार दर्शन  श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पारंपरिक पदस्पर्श दर्शन कोरोनामुळे बंद करण्यात आलेले आहे. जवळपास ४० फूट अंतरावरून देवाचे मुखदर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनाची रांग वेगाने पुढे सरकत आहे. सध्या मंदिरात प्रतितासाला अडीच हजारांपर्यंत वारकरी दर्शन घेत आहेत. सध्या २१ तास दर्शन सुरू असून, नित्योपचार करण्यासाठी सुमारे तीन तास दर्शन बंद राहते आहे.  एसटीच्या बंदचा परिणाम  राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सर्वाधिक एसटीने येत असतात. पण यंदा एसटी कामगारांच्या बंदमुळे वारकऱयांना पंढरपूरला येण्यात अडचण आली आहे. खासगी वाहनाने वारकरी येत आहेत. पण ही संख्या मर्यादित आहे. कधी नव्हे ती वारीला परवानगी मिळाली. परंतु आता एसटी अभावी वारकऱयांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com