हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सुरू

kartik wari starts
kartik wari starts

आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि ब्रह्मवृंदाच्या अखंड मंत्रोच्चारात बुधवारी सकाळी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला. 

सकाळी नऊच्या सुमारास माउलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. मंदिराच्या सेवकांनी पायरी स्वच्छ केली. महाद्वारात पायरीपूजनासाठी भाविकांची गर्दी झाली. महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला वारकऱ्यांचा माउली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. गुरू हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर माउलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.

देऊळवाड्यातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली. विजय कुलकर्णी, यज्ञेश्वर जोशी आणि तुर्की यांनी पौराहित्य केले. या वेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे, बाबूराव चोपदार, डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, दिंडी संघटनेचे सचिव मारुती कोकाटे, आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, ज्ञानेश्वर वीर, डी. डी. भोसले, ज्ञानेश्वर गुळूंजकर, भाऊमहाराज फुरसुंगीकर, अजित वडगावकर उपस्थित होते.

हैबतबाबांच्या वतीने विश्वस्त आणि मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दुपारी माउलींच्या समाधीजवळ महानैवद्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी साडेसहा ते आठ वीणा मंडपात योगिराज ठाकूर आणि रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन, रात्री हैबतबाबा यांच्या पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्या वतीने जागरचा कार्यक्रम झाला. देवस्थानच्या वतीने वारी काळात दर्शनाच्या रांगेतील भाविकांना कार्तिकी वद्य अष्टमीपासून अमावास्येपर्यंतच्या कालावधीत मोफत खिचडी आणि चहा वाटप केला जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com