महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित व्हायचेय : काश्‍मिरी शेतकऱ्यांनी व्यक्त केला विश्‍वास

पुणे : जम्मू-काश्‍मिरातील दोडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली, त्याप्रसंगी वार्तालाप केला.
पुणे : जम्मू-काश्‍मिरातील दोडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली, त्याप्रसंगी वार्तालाप केला.

पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन करताना नवतंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान, शेततळ्याचा वापर करतात. यांत्रिकीकरण, गटशेती आणि डेअरी तंत्रज्ञान अत्यंत विकसित असे आहे. सहकारी संस्थांचा पतपुरवठा कृषी विकासात उपयुक्त आहे. येथील शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही विकसित व्हायचे आहे, अशा प्रतिक्रिया जम्मू-काश्‍मिरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.  महाराष्ट्रातील शेती, शेतकरी, कृषी व्यवसाय, उद्योग पाहण्यासाठी काश्‍मिरातील दोडा जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी नुकतीच (ता.११) ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. या प्रसंगी झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. या वेळी शेतकरी बलवंत सिंग (बोलियान), बन्सीलाल (कारिचत्रा), ओमप्रकाश (धोसा), दिनेशसिंग (चिरोटा), हिंदभूषण (गजोटे), आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव हे उपस्थित होते. दोडाचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांच्या प्रयत्नातून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. दोडा जिल्ह्यात प्रामुख्याने शेतकरी सफरचंद, पीयर, धिंगरी अळिंबी, मका, राजमा, अक्रोड, केशर, झेंडूची फुल, भाजीपाल्यासह टोमॅटो, बटाटा, कोबी, कारले, भात पिकांची लागवड करतात. कमी-अधिक प्रमाणात पोल्ट्री, मत्स्यपालन आणि डेअरी यांचा समावेश असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. बलवंतसिंग म्हणाले, ‘‘मी सहा-सात वर्षांपासून सेंद्रिय शेती करतो. मात्र आमच्याकडे त्याचा फारसा प्रसार नाही. तो वाढविण्याचा विचार आहे. सफरचंद, अक्रोड, धिंगरी अळिंबीची शेती करतो.’’ हिंदभूषण म्हणाले, ‘‘आमच्याकडे पूर्वी मक्याची शेतीच होत होती. सध्या सफरचंद, झेंडू, अक्रोडसह पोल्ट्री, मत्स्यपालन होत आहे. महाराष्ट्र शेतीत अत्यंत प्रगतिशील आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर, डेअरी पाहून आम्ही प्रभावित झालो.’’ मका, राजमा उत्पादक शेतकरी ओमप्रकाश म्हणाले, ‘‘दोन्ही राज्यांतील जमिनीत खूप फरक आहे. महाराष्ट्रात शेतीत खूप सुधारणा झाल्या आहेत. येथील सहकार क्षेत्रातून होणारा पतपुरवठा पाहून समाधान वाटले.’’ काश्‍मिरातील शेतीत येणाऱ्या विविध अडचणी आणि संधींविषयी टीम ॲग्रोवनबरोबर या शेतकऱ्यांनी चर्चा केली. प्रतिकूल हवामान, सूक्ष्म सिंचनाचा अभाव, मजूर टंचाई, बाजारभावातील शोषण आणि समस्या, कृषिपूरक प्रक्रिया उद्योगांच्या अभावाचे मुद्दे समोर आले. सफरचंद, केशर, फूलशेतीसारख्या महत्त्वाच्या पिकांतील संधी शोधताना महाराष्ट्राप्रमाणे सूक्ष्मसिंचन, यांत्रिकीकरण, गटशेती, शेतकरी कंपन्यांचे निर्माण, करार शेतीला प्राधान्य देण्याचा निश्‍चय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.  शेतीमाल स्थानिक मंडीमध्ये विकला जातो. येथे मध्यस्थांचे मोठे वर्चस्व आहे. पडेल त्या भावाला शेतीमाल विकावा लागतो. पुण्यात ग्राहकाला सफरचंद १०० रुपये किलो मिळतात, आपण कितीला विकता? यावर शेतकऱ्यांनी १६ किलोच्या पेटीला सर्वसाधारण पणे ३०० ते ४०० रुपये मिळतात (प्रतिकिलो १८ ते २५ रुपये) असे या शेतकऱ्यांनी सांगितले.  जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न.. दोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूरज डोईफोडे हे महाराष्ट्रातील आहेत. आमच्याकडील शेतीत सुधारणा होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीत महाराष्ट्र अग्रेसर असल्यामुळे त्यांनी आम्हाला या अभ्यास दौऱ्यावर पाठविले. यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळाले. महाराष्ट्राप्रमाणे आमच्याकडेही शेतीत बदल होण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे या शेतकऱ्यांनी सांगितले. काश्‍मिरी शेतकऱ्यांनी मांडलेले मुद्दे...

  • तीन महिने बर्फ पडतो, तापमान उणे जाते   
  • पाणी, मजूरटंचाई, कमी पतपुरवठा
  • सूक्ष्मसिंचन, यांत्रिकीकरणाचा अभाव
  • बाजारभावात मध्यस्थांकडून लूट
  • बहुतांश नवी पिढी अनिश्‍चेनेच शेतीत
  • गटशेती, शेतकरी कंपन्या नाहीत
  • जिल्हाधिकारी प्रतिक्रिया... काश्‍मिरातील दोडा जिल्ह्यात फलोत्पादन आणि बिगर हंगामी भाजीपाला उत्पादनाची चांगली क्षमता आहे. कृषी पर्यटनासही मोठा वाव आहे. याअंतर्गत येथील शेतकऱ्यांच्या व्यावसायिक वृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्‍मीर कृषी विभागातर्फे निवडण्यात आलेल्या काही शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यांकरिता निवडले जाते. महाराष्ट्रातील कृषी विषयक संस्था काश्‍मिरातील शेतकऱ्यांकरिता अशा उपक्रमांसाठी पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे.                                                   - डॉ. सागर डोईफोडे, जिल्हाधिकारी, दोडा, जम्मू-काश्‍मीर  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com