अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्त

Kavade Co-operation and Rao Sugar Commissioner
Kavade Co-operation and Rao Sugar Commissioner

मुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, ए. एम. कवडे यांची राज्याचे सहकार आयुक्त म्हणून तर सौरभ राव यांची साखर आयुक्तपदी, विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र आरंभले आहे. याआधी १६ जानेवारीला ठाकरे यांनी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी आणखी बदल्या करून प्रशासनात खांदेपालट केला आहे. आधीच्या बदल्यांमध्ये राजीव जलोटा यांची ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांच्याऐवजी आता अरविंद कुमार यांच्याकडे जबाबदारी असणार आहेत. 

धडाकेबाज कार्यशैलीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेत बदली करण्यात आली आहे.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ''होमपीच'' असलेल्या नागपूरमध्ये मुंढेंची नियुक्ती करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना शह दिल्याचे बोलले जाते. मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई, नाशिक महापालिकेत त्यांची कारकीर्द गाजली होती. पुणे परिवहन प्राधिकरणात वादग्रस्त ठरल्यानंतर मुंढेंची बदली महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी करण्यात आली होती. आता ठाकरे यांनी मुंढेंवर नागपूर महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी दिली  आहे. 

मेट्रोच्या आरेतील कारडेपोसाठी एका रात्रीत झाडांची कत्तल करून चर्चेत आलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओलांची नेमणूक करण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव राजीव निवतकरांची नियुक्ती झाली आहे. 

अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे  अरविंद कुमार (अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास आणि जलसंधारण), दिनेश वाघमारे (अध्यक्ष, महापारेषण), पराग जैन (सचिव, सामाजिक न्याय), राजीव जाधव (सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय), प्राजक्ता वर्मा (सचिव, मराठी भाषा विभाग), शेखर गायकवाड (आयुक्त, पुणे महापालिका), ए. एम. कवडे (आयुक्त, सहकार आणि नोंदणी), सौरभ राव (साखर आयुक्त), एस. एस. डुंबरे (महासंचालक, मेडा पुणे), ओमप्रकाश देशमुख (नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक पुणे), शिवाजी जोंधळे (सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय), कांतिलाल उमाप (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क), आनंद रायते (अतिरिक्त आयुक्त भूमिअभिलेख, पुणे), संपदा मेहता (सहआयुक्त विक्रीकर मुंबई), आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे), यू. ए. जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला), किरण पाटील (उपसचिव, मुख्य सचिव कार्यालय).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com