`अचूक पेरणी क्षेत्रासाठी नोंदवही ठेवा`

`अचूक पेरणी क्षेत्रासाठी नोंदवही ठेवा`
`अचूक पेरणी क्षेत्रासाठी नोंदवही ठेवा`

परभणी : ‘‘नियोजन तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर पेरणी झालेल्या पीक आणि क्षेत्राची अचूक नोंद आवश्‍यक आहे. त्यासाठी अचूक पेरणी अहवाल शासनास सादर करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील गावनिहाय, खातेदारनिहाय पीक आणि क्षेत्र नोंदीसाठी ग्रामस्तरावर पीकपेरणी नोंदवही ठेवा,’’ असे निर्देश औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे मराठवाड्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

काही वेळेस प्रत्यक्ष पेरणी झालेले पीक, क्षेत्र आणि कृषी विभागाकडून अहवालाद्वारे कळविण्यात आलेले पीक आणि क्षेत्रात मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे विविध हंगामांमध्ये विविध पिकांच्या अंदाजित उत्पादनाच्या आकडेवारीमध्येही चूक होते. नियोजन स्तरावर तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने पीक आणि पेरणी क्षेत्राची आकडेवारी जास्तीत जास्त अचूक असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्तरावरच आकडेवारीमध्ये अचूकता आणणे आवश्यक आहे. त्यासाठी गावनिहाय, खातेदारनिहाय पीक आणि पेरणी क्षेत्राची नोंद ठेवावी. 

गावातील कृषी सहायकाने शेतकऱ्यांच्या मदतीने पिकांच्या व क्षेत्राच्या नोंदी घ्याव्या. त्यावरून साप्ताहिक पीकपेरणी अहवाल तयार करून शासनास सादर करावा. पीकपेरणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा. तालुका कृषी अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीकपेरणीच्या नोंदी घेत असल्याची खात्री वेळोवेळी करावी, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मान्यतेने उपायुक (महसूल) यांनी निर्देश दिले.

ग्रामस्तरावरील पीकपेरणी नोंदवहीत संबंधित गावातील कृषी सहायकाने एकूण १ ते ६२ रकान्यामध्ये माहिती भरावयाची आहे. यामध्ये शेतकरी खातेदाराचे नाव, बॅंक खातेक्रमांक, कुटुंबातील सदस्य, सर्वे नंबर, नमुना आठ अ प्रमाणे धारणा क्षेत्र, पेरणी योग्य क्षेत्र, त्यापैकी ओलिताचे क्षेत्र, ओलिताचे साधन, पीकनिहाय खरीप पिकाखालील लागवड क्षेत्र, फळपिके, भाजीपाला पिके, इतर पिके, देण्यात आलेल्या खताचा प्रकार आणि मात्रा, बांधावर उपलब्ध झाल्याबाबतची माहिती, माती परीक्षण, बांधबंधिस्ती, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विहिरीचा लाभ, रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, तुती लागवड, रेशीम उद्योग तयारी, मधुमक्षिका पालन व्यवसाय तयारी, दुधाळ जनावरांची संख्या, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम, प्रलंबित कर्जप्रकरणे, पीकनिहाय रब्बी पिकांचे लागवड क्षेत्र, अपेक्षित उत्पन्न, संभाव्य बाजारपेठ, शेतकऱ्यांची स्वाक्षरी, शेरा आदी माहिती राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com