दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'चा सुगंध!

आंबा उत्पादन
आंबा उत्पादन

केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात येण्यासाठी एक-दीड महिना अवकाश असताना बीड जिल्ह्यातील सोनीजवळा (ता. केज) येथील शेतकरी प्रकाश ससाणे यांच्या बागेत मात्र ‘केसर आंब्या''चा सुगंध आताच दरवळू लागला आहे. वातावरणाचा अंदाज घेत धरलेला मोहोर आणि योग्य व्यवस्थापनाच्या आधारे एप्रिल-मेमध्ये येणारा केसर आंबा त्यांच्या बागेत मार्चमध्येच लगडला आहे. वास्तविक, मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ज्याला सोनीजवळाही अपवाद नाही, अशा भागात पाण्याची जेमतेम उपलब्धता असतानाही आंबा बाग जगवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे ‘फळ''च म्हणावे लागेल.  कळंब-अंबाजोगाई महामार्गावर युसूफवडगावपासून आत तीन किलोमीटरवर आणि केजपासून दहा किलोमीटरवर सोनीजवळा हे गाव आहे. या परिसरात सध्या पाण्याची भीषणटंचाई आहे. परंतु, ससाणे यांनी उपलब्ध पाण्यावरच केसर आंब्याची बाग जगवली. दुष्काळी पट्ट्यात आत्ताच केसरचा सुगंध या ओसाड माळरानात दरवळत आहे. नवीन काही तरी करण्याची धमक आणि कष्टाची तयारी असेल तर असाध्य गोष्टही साध्य करता येऊ शकते, हे फक्त सातवी शिकलेल्या प्रकाश ससाणे यांनी आपल्या या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. माळीनगर (ता. माळशिरस) येथील विनय वाघधरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बागेचे व्यवस्थापन ठेवले. साडेचार एकरावर ससाणे यांची केसर आंबा बाग आहे. त्यात लिंबूचेही आंतरपीक घेतले आहे. या संपूर्ण क्षेत्रात सुमारे आंब्याची एक हजार झाडे आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी २० बाय १० फुटावर कलमांची लागवड केली. यंदा पहिल्यांदाच ते आंब्याचे उत्पादन घेत आहेत आणि तेही सर्वांत आधी. आज त्यांच्याकडील कलमाला किमान १०० ते १५० आंबे लगडले आहेत. शिवाय आणखी काही फाद्यांना मोहोर फुटतोच आहे. त्यामुळे यानंतरही आंबा उत्पादन मिळणार आहेत. येत्या दोन दिवसांत मराठवाड्यासह अन्य बाजारात त्यांच्या बागेतील आंबा पोचणार आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी केली आहे. जागेवरच सरासरी प्रतिकिलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. योग्य व्यवस्थापनावर दिला भर कोकणात जून-जुलैमध्ये भरपूर पाऊस पडतो. बागा डोंगर-उतार असल्याने झाडांना ताण चांगला बसतो, शिवाय पुढे थंडीही लवकर येते. त्यामुळे मोहोर निघणारी काडी चांगली तयार होते. या भागात ऑक्‍टोबरमध्ये चांगला मोहोर येतो. त्यामुळे त्या भागातील आंबा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये येतो. कोकण सोडून राज्यातील इतर भागांत जूनमध्ये थोडा पाऊस पडतो, त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरला परतीचा पाऊस जास्त पडतो, त्यामुळे सप्टेंबर-ऑक्‍टोबरला नवीन पालवी फुटते, परंतु थंडी उशिरा येते, त्यामुळे या भागातील मोहोर डिसेंबर अखेरीस येतो. पावसाचा अंदाज घेऊन ससाणे यांनी आंबा बागेत मे-जूनमध्ये कलमांचे शेंडे मारून हलकी छाटणी केली. जुलैमध्ये नवीन पालवी फुटली. त्यानंतर १५ ऑगस्टनंतर बाग ताणावर सोडून ऑक्‍टोबरमध्ये नवीन पालवी फुटू नये, यासाठी तज्ज्ञांच्या सल्‍ल्याने योग्य व्यवस्थापन ठेवले. त्यानंतर तीन महिने पाण्याचा ताण दिला. ऑक्‍टोबरमध्ये चांगला मोहोर आला. या टप्‍प्यात शिफारशीत अन्नद्रव्यांचा वापर आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवल्याने मार्चमध्ये फळधारणेला सुरवात झाली, अशी माहिती प्रकाश ससाणे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया कलमांची हलकी छाटणी आणि योग्यवेळी धरलेला मोहोर हेच आंबा लवकर येण्याचे कारण आहे. शिवाय पाणी आणि खताचे योग्य व्यवस्थापनही महत्त्वाचे ठरले.  - विनय वाघधरे, तज्ज्ञ शेतकरी, माळीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com