खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर पोचणार

खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर पोचणार
खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर पोचणार

जळगाव  ः खानदेशात या हंगामात मिळून साडेतीन लाख हेक्‍टरपर्यंत रब्बी पिकांची पेरणी होऊ शकते. हरभऱ्याचे क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर पोचण्याचा अंदाज आहे.  तापी, गिरणा व पांझरा नदीकाठावरील काळ्या कसदार जमिनीत दादर (ज्वारी), हरभऱ्याची पेरणी दसरा सणानंतर होण्याचे संकेत आहेत. सध्या शेतकरी पूर्वमशागत करून घेत आहेत. पेरणीसाठी घरी जतन केलेल्या ज्वारी व हरभरा वाणांचा वापर शेतकरी करतील, अशी स्थिती आहे. परतीचा पाऊस बऱ्यापैकी असल्याने वाफसा टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.  मागील हंगामात रब्बीला दुष्काळाचा किंवा कमी पावसाचा फटका बसला होता. कोरडवाहू दादर, हरभऱ्याची पेरणी अपवाद वगळता झाली नव्हती. यंदा प्रकल्पांमध्येही १०० टक्‍क्‍यांपर्यंत साठा आहे. जळगावमधील गिरणा, वाघूर, हतनूर, गूळ, धुळ्यातील पांझरा, अमरावती, जामखेडी, सोनवद आदी प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. या प्रकल्पांमधून रब्बीसाठी हमखास आवर्तन मिळेल. यामुळे रब्बीचे क्षेत्र मागील हंगामाच्या तुलनेत एक लाख हेक्‍टरने वाढू शकते. जळगाव जिल्ह्यात किमान ८० ते ९० हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित आहे. तर धुळे, नंदुरबारात मिळून सुमारे ६० ते ६५ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी होईल. मका लागवडही अधिक राहू शकते. कारण, दर स्थिर आहेत. परंतु, अमेरिकन लष्करी अळीच्या धोक्‍यामुळे अनेक शेतकरी मक्‍याऐवजी संकरित ज्वारी, गहू व बाजरी पेरणीचे नियोजन करीत आहेत.  ज्वारीची देखील खानदेशात मिळून ४० ते ५० हजार हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे. तर मक्‍याचे क्षेत्रही ४० हजार हेक्‍टरपर्यंत राहू शकते. या पाठोपाठ गहू, बाजरीची पेरणी होईल. गव्हाची जळगाव जिल्ह्यात सुमारे २२ हजार हेक्‍टरवर पेरणी होऊ शकते. तर बाजरीचीदेखील जळगाव व धुळ्यात मिळून १५ ते १६ हजार हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे. 

यंदा वाफसा बऱ्यापैकी असल्याने कोरडवाहू ज्वारी (दादर), हरभऱ्याची पेरणी होईल. सध्या पूर्वमशागत काही भागात सुरू आहे. आमच्या भागात कोरडवाहू ज्वारीसाठी अनुकूल स्थिती यंदा आहे. - किशोर चौधरी, शेतकरी, आसोदा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com