खानदेशात कांदा प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये

The arrival of onion in Khandesh increased
The arrival of onion in Khandesh increased

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काहीशी वाढली असून, दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक मागील चार ते पाच दिवसांत वाढल्याची माहिती मिळाली. 

कांद्याची लागवड कमी झाली होती. ७ नोव्हेंबरपर्यंत पाऊस आला. यामुळे हंगाम लांबणीवर पडला. काढणी उशिराने सुरू झाली. आवकही कमी झाली होती. यामुळे दर वधारले. ज्या शेतकऱ्यांचा कांदा दर्जेदार होता, त्यांना मागील पंधरवड्यात प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपर्यंतचे दर मिळाले. तर कमी दर्जाच्या कांद्यासाठी किमान अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. 

कांद्याची आवक धुळे, पिंपळनेर (ता. साक्री), साक्री, जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) या बाजार समित्यांमध्ये होत आहे. आवक मागील सात- आठ दिवसांत काहीशी वाढली असून, जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात प्रतिदिन ८०० क्विंटलपर्यंतची आवक झाली. दर्जेदार कांद्याला मागील आठवड्यात किमान २५०० व कमाल ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात चढउतार झाले. परंतु, दर पाच हजार रुपयांखाली आलेले नसल्याची माहिती मिळाली. अडावद व धुळे येथील बाजारातही मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक जळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे, साक्री, शिरपूर या भागांतून होत आहे. 

काही शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर येथील बाजारातही कांद्याची विक्री केली. धुळे, शिरपूर, शहादा, चोपडा तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची पाठवणूक इंदूर व बडवानीच्या बाजारात केली. तेथे कांद्याला प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपयांपर्यंतचे दर मिळाले. कांद्याची आवक आणखी १० ते १२ दिवस टिकून राहण्याचे संकेत आहेत. काही खरेदीदारांनी थेट शेतातून कांद्याची खरेदी केली. यातही दर्जेदार कांद्यास प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांचा दर चोपडा, यावलमधील शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com