खानदेशात ५७ टक्‍क्‍यांवर पाऊस

खानदेशात ५७ टक्‍क्‍यांवर पाऊस
खानदेशात ५७ टक्‍क्‍यांवर पाऊस

जळगाव ः खानदेशात पावसाने बॅकलॉग भरून काढला असून, मागील पाच-सहा दिवसांत सर्वत्र संततधार, मध्यम व जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. सातपुडा पर्वतासह नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, धुळे जिल्ह्यांतील साक्री येथेही दोन दिवस अतिवृष्टी झाली. 

जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांतील पावसात कुठेही अतिवृष्टी झाली नाही. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने खानदेशातील पावसाची टक्केवारी वाढली असून, ती सुमारे ५७ टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे. धुळे जिल्ह्यात ५२ टक्के, जळगाव जिल्ह्यात ५१ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ६२ टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला. 

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ७६५ मिलिमीटर, धुळ्यात ९२५ आणि नंदुरबारात सुमारे ११०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. जून व जुलैच्या मध्यापर्यंत हवा तसा पाऊस नव्हता. परंतु जुलैच्या अखेरिस सुरू झालेला पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बऱ्यापैकी बरसला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, यावल, जळगाव, एरंडोल, भुसावळ, रावेर, बोदवड, पारोळा या तालुक्‍यांमध्ये ५० टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. जामनेरात सर्वाधिक ६९ टक्के पाऊस मंगळवारी (ता. ६) सकाळी नऊपर्यंत झाला. चाळीसगाव, भडगाव, चोपडा आदी तालुक्‍यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झालेला नाही. सुरवातीपासून या भागात पर्जन्यमान कमी असून, हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. 

उघडीप हवी मागील सात-आठ दिवस सतत पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात जीर्ण घरांची पडझड होण्याची भीती आहे. शेतरस्त्यांवर चिखल असून, केळी, भाजीपाल्याची काढणी, वाहतूक करताना अडथळे येत आहेत.

सततच्या पावसाने काळ्या कसदार जमिनीत पपई, कापूस आदी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तण वाढत असून, नुकसानीची स्थिती आहे.  - रोहित पाटील, शेतकरी वडछील, जि. नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com