खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरु

खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक

जळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास आटोपली आहे. यंदा अधिक पावसामुळे ज्वारीला फटका बसलेला नसल्याने दाणे दर्जेदार येत आहेत. त्यास बाजारात १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत.

काळ्या कसदार जमिनीत ज्वारीचे चांगले उत्पादन आले आहे. मुरमाड, हलक्‍या जमिनीत मात्र अपेक्षित उत्पादन आलेले नाही. कसदार चाराही उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांना जादा दराची अपेक्षा असल्याने  सध्या बाजारात अपेक्षित आवक नाही. ज्वारीची पेरणी खानदेशात केळी पट्ट्यात बेवड म्हणून केली जाते. रावेर, यावल, चोपडा, शहादा भागात केळी उत्पादक पशुधनाला सकस चारा व बेवड यासाठी ज्वारीची पेरणी करतात. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, धुळे भागातही कमी अधिक क्षेत्रावर पेरणी केली जाते.

नंदुरबारमध्ये नंदुरबार, शहादा तालुक्‍यांत ८० टक्के ज्वारीची मळणी आटोपली आहे. कोळदे, लहान शहादे भागात काही शेतकऱ्यांना एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन व चांगला चारा मिळाला आहे. टपोरे, शुभ्र दाणे असल्याने दरही बऱ्यापैकी आहेत. नंदुरबार, दोंडाईचा (जि. धुळे) बाजार समितीत ज्वारीची आवक वाढत आहे. जळगाव भागात फारशी आवक नाही. जळगाव जिल्ह्यात रावेर, मुक्ताईनगर व चोपडा बाजार समितीत बऱ्यापैकी आवक होत असते. सध्या या चार पाच बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन ४०० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, पाचोरा भागात मजूरटंचाईमुळे काही शेतकऱ्यांची ज्वारीची कापणी रखडली आहे. ज्वारीला मागील वर्षी १४०० रुपये कमाल, तर किमान दर १००० रुपये दरही मिळाले. यंदा दर बऱ्यापैकी असल्याने ज्वारी मूग, सोयाबीनच्या तुलनेत ज्वारी परवडल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण भागातून येत आहेत.

काही शेतकऱ्यांच्या ज्वारीची गावातच विक्री होत आहे. कारण शेतमालक आपले सालगडी, मजूर यांना दरवर्षी एक ते दोन क्विंटल ज्वारी देतात. ही ज्वारी गावातच खरेदी करून आपल्या सालगडी मंडळीला देण्याचे नियोजन मोठ्या शेतकऱ्यांनी केल्याने त्याचा काहीसा लाभ ज्वारी उत्पादकांना होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com