शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार हजेरी लावत खरीप पिकांना दणका दिला आहे. मराठवाडा कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खरिपाच्या काढणीस आलेल्या पिकांचे  भिजून मोठे नुकसान झाले आहे. काढून ठेवलेली सोयाबीन, भात, कापूस, ज्वारी पिके पाण्यात गेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जालना जिल्ह्यातील सातोना येथे १७४ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे १७० मिलिमीटर, परभणी जिल्ह्यातील देऊळगाव (ता.सेलू) येथे १६५, तर सेलूत १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.   मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील १६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांचे पाणी पिकांमध्ये शिरल्याने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यातील सर्व पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जालन्यातील वाघ्रुळ जहागीर, दाभाडी, हसनाबाद, परतूर, सातोना व श्रीष्टी येथे अतिवृष्टी झाली. सातोना येथे १७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यातील तांदूळजा महसूल मंडळात १७० तर चिंचोली महसूल मंडळात ११२ मिलिमीटर पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे या मंडळातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे मांजरा नदीलाही पाणी आले आहे. या पाऊस रब्बीसाठी चांगला असला तरी खरिपातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदीवर असलेले घुंगशी बंधारा भरल्याने नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात काढणीनंतर मळणीसाठी गंजी लावून ठेवलेले सोयाबीन पीक भिजले आहे.  सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच पाणीच पाणी झाले असून, काढणीला पिकांत साचल्यामुळे नुकसान सुरू आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी सुरू असून, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. सोयाबीन, भात, स्ट्रॉबेरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढे-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. सोयाबीन भिजले असून ज्वारी काळी पडू लागली. आले व हळदीच्या पिकांत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे.  पुणे जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस पडत असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीर, घोड, नाझरे, उजनी, भामा आसखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेले सोयाबीन, मका, बाजरीसह, भुईमूग, बटाटा, फुलशेती भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे.  नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अतिवृष्टी अकोले तालुक्यात भातासह जिल्हाभरात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. शनिवारी दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस पडला. कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले भागात झालेल्या पावसामुळे कापूस, बाजरी, भाताचे नुकसान होत आहे. मात्र रब्बीतील ज्वारीसह अन्य पेरणीला वेग येण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीकामाचे नियोजन विस्कळित झाले आहे. संततधार पावसामुळे सुरू असलेली खरीप पिकांच्या मळणीची कामे ठप्प झाली आहेत. येत्या काही दिवसांत या पावसाचा विपरीत परिणाम शेतीच्या सर्व कामावर होणार आहे. काढणीला आलेली खरीप पिके तशीच शेतात राहिल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळांनाही बसत आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवस जिल्ह्यात पडलेल्या पावसाने कापणीला आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो एकर उभी शेतं आडवी झाली आहेत. भातामध्ये दाणे भरले असून, पावसात भिजल्याने संपूर्ण पीक शेतात आडवे होते. शेतात पाणी साचले असल्याने भाताचे दाणे पाण्यात भिजून मोड फुटण्याची भीती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com