सोलापुरात यंदाही खरीप कोरडाच

पावसाच्या आशेने उडीद, मुगाची पेरणी केलीय. आता कुठे कुठे उगवलंय. कोळपणीही केली. पण आता पाऊस पडला, तरी त्याचा उपयोग होणार नाही. - नितीन बागल, शेतकरी, गादेगाव, ता. पंढरपूर.
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाच
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाच

सोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला. तरीही, पावसाने दमदार हजेरी न लावल्याने अधूनमधून पडलेल्या जेमतेम पावसावर अवघ्या ३७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदाही तूर, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी बऱ्यापैकी क्षेत्रावर झाली आहे. पण, त्या पावसाअभावी तग धरू शकतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे यंदाही खरीप कोरडाच जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केवळ ३९ टक्के असमान पाऊस झाला आहे.

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा आहे, पण गेल्या काही वर्षांत खरिपाचे क्षेत्रही वाढते आहे. खरिपामध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन, मका, मूग, उडदाची पेरणी होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सात्यत्याने दुष्काळाची परिस्थिती असल्याने खरीप हाताला लागत नाही. यंदाही तशीच काहीशी परिस्थिती आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. पण आतापर्यंत जूनमध्ये १०१ मिलिमीटर आणि जुलैमध्ये १४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी ४० टक्के पाऊस झाला आहे. पण तोही सरसकट नाही, याच पावसाच्या जेमतेम ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या.

जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र दोन लाख २३ हजार ५१८ हेक्टर आहे. त्यापैकी ८२ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर (३७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक तुरीची ३२ हजार ४९४ हेक्टर, त्यानंतर उडीद १४, ८९२ हेक्टर, सोयाबीनची ६७८२ हेक्टर, मूग ६०७० हेक्टर, बाजरी २०१४ हेक्टर आणि मका ४०९४ हेक्टरवर पेरली आहे. त्याशिवाय इतर कडधान्य आणि गळित धान्याचा पेरणीमध्ये समावेश आहे. 

प्रामुख्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोल्याचा काही भाग, पंढरपूर या भागात पेरणीचे क्षेत्र आहे. पण सध्या पाऊस नसल्याने पेरणी झालेल्या या पिकाच्या वाढीबाबत शंकाच आहे. दुबार पेरणीची वेळही जवळपास संपत आली आहे. 

दीड महिना उलटला, तरी पाऊस नाही. पेरणीचे क्षेत्र तसे जेमतेम आहे. पण, पाऊस नसल्याने तेही वाया जाण्याची शक्यता आहे. आणखी पेरणी किती वाढेल, हे सांगता येणार नाही. पावसावरच सगळे गणित अवलंबून आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी    एस. पी. बेंदगुडे यांनी सांगितले.

पेरणी झालेले क्षेत्र 

पीक क्षेत्र (हेक्टर)
तूर ३२ हजार ४९४
मूग  ६,०७० 
उडीद १४,८९२
भुईमूग  १५५५ 
कारळ  ११३ 
मका ४०९४
सूर्यफूल  ३,९५४ 
सोयाबीन ६७८२ 
ऊस २०२२ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com