अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा फटका

अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा फटका
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा फटका

अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व काही ठिकाणच्या अतिवृष्टीने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सुमारे ७२५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यंत्रणांनी केलेल्या अहवालांवर अंतिम हात फिरवला जात असून, लवकरच हा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. अकोला जिल्ह्याने २४८ कोटी २४ लाख रुपयांची मागणी असलेल्या अहवालाला अंतिम रूप दिले आहे. 

अकोला जिल्ह्यात पावसामुळे २ लाख ९७ हजार ६६८ शेतकऱ्यांचे २४८ काेटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी, अवकाळीमुळे ३ लाख ६५ हजार ६९ हेक्टरवरील पिके बाधित झाली. गेल्या १५ दिवसांपासून महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करीत अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, तीळ आणि इतर पिकांचे नुकसान झालेले आहे.

पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन शेंगा, ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले. काही ठिकाणी कापसातूनही कोंब बाहेर निघाले होते. पावसामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये खरिपात पेरलेल्या सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. शासन निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायकांनी नुकसानीचा संयुक्त सर्व्हे करून त्यासंबंधीचा अहवाल तयार केला. 

या अहवालानुसार अकाेला, बार्शीटाकळी, अकाेट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर व पातूर तालुक्यातील ३ लाख ६५ हजार ६९.४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. संयुक्त अहवालानुसार अकाेला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर व अकाेट तालुक्यातील १ लाख ७३ हजार ४०५ हेक्टरवरील सोयाबीन व १ लाख ७३ हजार ४०५ हेक्टरवरील कापूस पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. १० हजार ८३४ हेक्टरवरील ज्वारी, १ हजार ४६० हेक्टरवर तूर, १०६ हेक्टरवरील तीळ, २०.६ हेक्टरवरील मका, ३ हेक्टरवरील भुईमूग व २६ हजार १४५.३ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. हे नुकसान ४७५ कोटींपेक्षा अधिक असून, अहवाल अंतिम झाल्यानंतर ते स्पष्ट होणार आहे. खरीप लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ६ लाख ८१३१९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सोबतच ४५०७ हेक्टरवरील बागायती पिके व ४७७९ हेक्टरवरील फळपिकांनाही फटका बसला. सर्व मिळून ४७७ कोटींचे नुकसान आहे. मेहकर व चिखली तालुक्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी ५० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज आहे. तर खामगाव, सिंदखेडराजा, बुलडाणा, मोताळा या तालुक्यांचे नुकसान सरासरी ३० कोटींपेक्षा जास्त आहे.

विमा काढलेल्या क्षेत्राचे काय? यंत्रणांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करीत अहवाल बनविले आहेत, यामध्ये विमा काढलेल्या क्षेत्राचाही सर्व्हे केला. आता मात्र पुन्हा या क्षेत्राचे छायाचित्र काढून जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना काढण्यात आल्या आहेत. विमा कंपन्यांकडून स्थानिक पातळ्यांवर काम करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे आदेश नसल्याने ते तालुक्यांच्या अहवालावर स्वाक्षऱ्या करीत नसल्याची बाब समोर आली आहे. विमा काढलेल्या क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी विमा कंपन्यांची स्वतंत्र यंत्रणा नाही. कृषी विभागाच्या सर्वेक्षणाच्या आधारेच पुढील मदत ठरणार आहे. १५ दिवसांपूर्वी सर्वेक्षण केलेल्या शेतकऱ्यांकडे पुन्हा कर्मचाऱ्यांना जाऊन छायाचित्र काढत जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश दिले. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात नुकसान झालेले पीक शेताबाहेर काढत रब्बीसाठी नव्याने शेत तयार केले. आता छायाचित्र कशाचे घ्यायचे, असा प्रश्न तयार होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com