देशात खरिपाची १०६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी

खरीप पेरणी
खरीप पेरणी

नवी दिल्लीः देशातील खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत १०६.२७ दक्षलक्ष हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी २०१८-१९ च्या खरीप हंगामात एक हजार ०६३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गेल्यावर्षी झालेल्या पेरणीएवढेच क्षेत्र लागवडीखाली आले आहे.  ‘‘देशात सर्वच भागात सध्या खरीप पेरणी आटोपली आहे. सध्या पेरणीच्या आकड्यांचे संकलन सुरू आहे,’’ अशी माहिती कृषी आयुक्त एस. के. मलहोत्रा यांनी यापूर्वीच दिली होती. २०१९-२० च्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत धान्योत्पादन १०.२ लाख टनांनी वाढून विक्रमी १४०५.७ लाख टनांवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.   यंदा देशात मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यानंतरही अनेक भागांत पावसाने दडी दिली होती. जुलैच्या महिन्याच्या मध्यानंतर मात्र सार्वत्रिक पाऊस झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आणि पेरणीखालील क्षेत्र वाढले. यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे देशात भात, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सूर्यफुल आणि तागाची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे. खरिपात भाताची सर्वाधिक लागवड होते, यंदा भात लागवड १.१८ टक्क्यांनी घटून ३८२ लाख हेक्टरवर झाली आहे.  कडधान्य पेरणीही १.७ टक्क्यांनी कमी होऊन १३४ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबिया लागवडीखालील क्षेत्र यंदा वाढले असून १७९.५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या हंगामात १७९.३ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड झाली होती. देशात तृणधान्य पिकाखालील क्षेत्रात यंदा १.७२ टक्क्यांनी वाढ झाली असून १७९.९ लाख हेक्टर क्षेत्र तृणधान्याखाली आहे.  तेलबिया उत्पादनात  स्वयंपूर्णतेचे लक्ष्य खाद्यतेलावर भारताला मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कडधान्यातील स्वयंपूर्णता साध्य केल्यानंतर तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. देशाला तेलबिया उत्पादनातील स्वयंपूर्णता साध्य करावयाची असल्यास देशात सध्या उत्पादित होत असलेल्या तेलबिया उत्पादनात दुपटीने वाढ करावी लागेल. देशात सध्या भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुल आणि मोहरी यांचे ३१४ लाख हेक्टर वार्षिक उत्पादन होत आहे.   विक्रमी अन्नधान्य  उत्पादनाचे उद्दिष्ट केंद्र सरकारने २०१९-२० च्या खरीप आणि रब्बी हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी २ हजार ८५९.५ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा त्यात २ टक्क्यांनी वाढ करून २ हजार ९११ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com