सोलापूरला मिळणार खरिपाची ओळख

सोलापूरला मिळणार खरिपाची ओळख
सोलापूरला मिळणार खरिपाची ओळख

सोलापूर  : सोलापूर हा सध्या रब्बीचा जिल्हा म्हणून गणला जातो. साहजिकच, जिल्ह्यातील सर्वच ११४४ गावे सध्या याच हंगामासाठी ग्राह्य धरली जातात. पण गेल्या काही वर्षांत खरीप हंगामातही वाढलेली पेरणी लक्षात घेऊन रब्बीबरोबर आता खरिपातही जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गावांच्या हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. ज्या नागरिकांना, संस्थांना यासंबंधी काही सूचना, हरकती, आक्षेप, द्यावयाचे आहेत. त्यांनी २१ जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

जिल्ह्यात ११४४ गावे आहेत. ती सर्व रब्बीची गावे म्हणून ओळखली जातात. मात्र कृषी विभागाकडील अहवालानुसार २००९ ते २०१२ या कालावधीत जिल्ह्यामध्ये खरीप पिकाची पेरणी ७५ टक्के झाली. त्याबरोबरच उजनी धरण व अन्य जलसिंचन सुविधामध्ये वाढ झाल्याने २०१३ ते २०१८ या कालावधीत खरीप पिकांची सरासरी पेरणी १०० टक्केपेक्षा जास्त झाली. मागील पाच, सहा वर्षांमध्ये खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्याचा समावेश आता खरिपातही करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकरी वा नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात सादर कराव्या. मुदतीनंतर प्राप्त होणारे आक्षेप, दावे, हरकतींचा विचार केला जाणार नाही. प्राप्त होणारे आक्षेप, दावे, हरकतींचा सर्वसमावेशक विचार करून याबाबतचा अहवाल पुणे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

खरिपातील समावेशानंतर हा होईल फायदा

सध्या जिल्ह्यातील ११४४ गावे रब्बीमध्ये गणली जातात. सुरवातीपासूनच सोलापूर हा रब्बीचा जिल्हा आहे. पण खरिपामध्येही बऱ्यापैकी क्षेत्रवाढ होत आहे. पण खरिपात १०० टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होऊनही, केवळ तांत्रिकदृष्ट्या सोलापूर हा खरिपात समाविष्ट नसल्याने शेतकऱ्यांना सवलती मिळू शकत नाहीत. पण हा समावेश झाल्यास शेतकऱ्यांना खरिपाच्या सर्व सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com