वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम   ः या मोसमात जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून पेरण्या साधल्या आहेत. खरिपातील विविध पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत झालेल्या लागवडीत अपेक्षेप्रमाणे सोयाबीन पिकाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे.

जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र पावणेतीन लाख हेक्‍टर असून आतापर्यंत दोन लाख ८७ हजार हेक्‍टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. अजूनही पेरण्या सुरू असून हे क्षेत्र तीन लाख हेक्‍टरचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हयात आतापर्यंत पावणे चार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र खरीप पिक लागवडीखाली आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

वाशीम जिल्हा हा गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे हब ओळखला जात होता. मागील दोन ते तीन वर्षांत शेतकरी कापूस पिकाकडे वळू लागले होते. त्यामुळेच मागील वर्षी ३० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. मात्र गेल्यावर्षी बोंड अळीचा झालेला प्रादुर्भाव आणि पिकाचे झालेले नुकसान पाहता पुन्हा एकदा हा शेतकरी सोयाबीनकडे वळाल्याचे दिसते.

कपाशीची लागवड कमी होऊन १८ हजार हेक्‍टरपर्यंत घसरली. म्हणजेच १२ हजार हेक्‍टरने हे क्षेत्र कमी झाले.  थोडेफार मुगाचे क्षेत्रही घटले. या जिल्ह्यात मुगाचे सरासरी १४,७९९ हेक्‍टर असताना त्यात चार हजार हेक्टरने घट होत १०,२३३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मात्र अर्धा जुलै संपत आल्याने शेतकरी त्यास किती पसंती देतात हे पेरण्यांचे क्षेत्र अंतिम झाल्यावर निश्‍चित होऊ शकेल. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र सलग पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांची स्थिती चांगली असून शेतकरी आता उघाड मिळाल्यापासून फवारणी तसेच आंतर मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.    

आतापर्यंत पीकनिहाय झालेली पेरणी
सोयाबीन    २,८७,०००
तूर   ५९,७८०
कापूस  १८,४४९
मूग १०,२३३
उडीद   १२,१२४
एकूण  ३,८७,५८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com