मराठवाड्यात पावसाची अवकृपा खरिपाच्या मुळावर

पिक
पिक

औरंगाबाद : जवळपास सात वर्षांपासून सातत्याने प्रत्येक पावसाळ्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडाचे सत्र अनुभवणाऱ्या मराठवाड्यात यंदाही तोच प्रकार सुरू आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या मराठवाड्यातील खरीप पिकाच्या मुळावर पावसाची अवकृपा उठली आहे. शिवाय पावसाच्या अभावासोबत पोषक वातावरणामुळे आलेल्या कीड-रोगांचेही फावत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. उपाय करूनही खरिपाची िपके हातची जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.   कायम अवर्षणाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात खरिपाच्या सरासरी ४९ लाख ९६ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी ४३ लाख ६८ हजार हेक्‍टरवरच पेरणी झाली. पेरणीच्या कालावधीत पावसाने केलेल्या दगाबाजीने जवळपास सव्वासहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणीच होऊ शकली नाही. गत सात वर्षांत मराठवाड्यात २० ते ४६ दिवसांपर्यंत पावसाचे खंड अनुभवायला आले. यंदाही सुरवातीपासूनच लहरी स्वरूपात पडणारा पाऊस मराठवाड्यावर सार्वत्रिकरित्या व समाधानकारक असा झालाच नाही. २८ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात एकूण आठ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांत अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ६० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात तर अपेक्षीत पावसाच्या तुलनेत केवळ ४३.७४ टक्‍केच पाऊस झाला. शिवाय बीड आणि जालना जिल्ह्यांतील चार मंडळांत तर आजपर्यंत १०० मिलिमिटरही पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.  कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा प्रयत्नही केवळ विमानाचे उडाण घेण्यापुरता मर्यादित असून त्याच्या फलिताविषयी दावा केला जात असला तरी तूर्त त्या प्रयत्नांची दिलासा देण्याइतपत नसल्याची स्थिती आहे. पावसायोग्य अपेक्षीत ढग मिळत नसल्याने अनेकदा त्याचा परिणाम तत्काळ कळत नाहीत. तुरळक, हलक्‍या, पावसासह ढगाळ वातावरणामुळे आजवर कसाबसा तग धरणारी पीक सुकण्याचे प्रमाण आता वाढले आहे. त्यातच ढगाळ व पोषक वातावरणामुळे अनेक पिकांना कीड रोगांनी ग्रासले आहे. अडीच लाख हेक्‍टरवरील मका पिकाला लष्करी अळी मोठ्या प्रमाणात पोखरत आहे. सरासरी १७ लाख ७६ हजार हेक्‍टर क्षेत्र असलेल्या कपाशीची प्रत्यक्षात १५ लाख ६ हजार हेक्‍टरवरच लागवड झाली. या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीच्या संकटाची टांगती तलवार कायम आहे. एकीकडे पावसाची अवकृपा व दुसरीकडे कीड रोगांचे आक्रमण दोन्हीचा सामना पिकांना करावा लागतो आहे.  पावसाची स्थिती

  •   ६८ मंडळांत दोनशे मिलिमीटरही पडला नाही पाऊस
  •   चार मंडळांत शंभर मिलिमीटरच्या आत पाऊस 
  •   पाच जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस नाही
  •   मका पिकावर लष्करी अळीचे संकट कायम
  •   कपाशीवरही गुलाबी बोंड अळीच्या संकटाची टांगती तलवार
  • १०० मिलिमिटरच्या आत पाऊस झालेली मंडळे  (२८ ऑगस्टपर्यंत)

    मंडळ   तालुका      पडलेला पाऊस
    बनसारोळा   केज     ७६ 
    धानोरा    आष्टी   ९५
    राजुरी     बीड    ७७
    जालना ग्रामीण   जालना    ८८

    पेरणी झालेले क्षेत्र(हेक्‍टरमध्ये)

    जिल्हा   सर्वसाधारण क्षेत्र  प्रत्यक्ष पेरणी
    औरंगाबाद   ७३२८४६ ६६६२२४
    जालना    ५८७२५७ ५५४४५७
    बीड    ७६३७८२ ७५१७३८
    लातूर  ६२४८६५     ४७२९३४
    उस्मानाबाद  ४१२९७०     ३८८६५६
    नांदेड   ८४८९२७   ७१२१०७
    परभणी  ६२४२४८  ४५५८८०
    हिंगोली   ४०१२८८      ३६६८७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com