खरीप हंगाम ठरणार अडथळ्यांची शर्यत

राज्याच्या कृषी क्षेत्रातील अडचणी विचारात घेत शासनाच्या पातळीवर २७ मार्चला आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात खते, बियाणे, कीडनाशके उद्योगाची गैरसोय दूर होईल, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. वाहतूक, पॅकेजिंग, प्रक्रिया हे मुद्दे आम्ही गृहीत धरून अनेक बाबींना सूट दिली आहे. काही मुद्दे स्थानिक पातळीवर असू शकतात. त्यावर तोडगा काढला जातो. पहिल्या टप्प्यात आम्ही द्राक्षे, मोसंबी, केळी तसेच इतर नाशवंत माल बाजारपेठांमध्ये तसेच ग्राहकांपर्यत जाण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दुसऱ्या टप्प्यात खरिपाचे नियोजन राहील. खतांबाबत आयुक्तालयात नियंत्रण कक्ष उघडला गेला आहे. रेल्वेने शेतमालाची वाहतूक सुरू झालेली आहे. त्यामुळे खरिपात जास्त अडचणी येतील असे वाटत नाही. — एकनाथ डवले, प्रधान सचिव, कृषी
farmer
farmer

पुणे : कोरोना विषाणू साथ नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत ३ मेपर्यंत वाढ झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, हमाल, व्यापाऱ्यांसह शेतकरी वर्गाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. भाजीपाला, फळे, दुधाचे नुकसान सुरुच आहे. त्यातच शेतीच्या दृष्टीने सर्वांत मोठा असलेल्या खरीप हंगामाची तयारी करण्याचे आव्हान कृषी खाते, निविष्ठा कंपन्या, विद्यापीठे, बॅंका आणि शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. वेळीच पावले न उचलल्यास येत्या खरिपात अन्नधान्याचे उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटू शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. खरीप हंगामावर राज्यातील ८० टक्के कोरडवाहू क्षेत्रासह सर्वच शेतीचे आणि त्यावर चरितार्थ असलेल्या ६० टक्के जनतेचे आणि प्रक्रिया उद्योगाचे आर्थिक भवितव्य अवलंबून असते.  लॉकडाऊनमुळे सध्या बियाणे उद्योगाची सर्व साखळी विस्कळीत झालेली आहे. दुसऱ्या बाजूला खरिपात विविध विद्यापीठांचे शेतकरी मेळावे महत्वाची भूमिका बजावतात. त्यात बियाणे विक्री मोठया प्रमाणात होते. संचारबंदीमुळे विद्यापीठांचे खरीप मेळावे होण्याची शक्यता दुरावली असून बियाणे विक्रीचे नियोजनही अंधारात आहे. तसेच कृषी विभागाच्या खरीप नियोजन बैठका आणि विविध जिल्हयांच्या कृषी पतपुरवठा आराखडा बैठका संचारबंदीत कशा घ्यायच्या असा प्रश्न समोर आला आहे. या वर्षासाठी या सगळ्याचे वेगळे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.  

पतपुरवठयात गोंधळ शक्य राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये खरिपासाठी एप्रिलमध्येच पतपुरवठयाचे नियोजन बॅंकांकडून होते. जिल्हाधिकारी या नियोजन आराखडयाला मान्यता देतात. त्यानंतर राज्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होते. यंदा जिल्ह्यापासून राज्यापर्यंत लॉकडाऊनचा बोलबाला असून पतपुरवठा आराखडयाबाबत बॅंका संभ्रमात आहेत. गेल्या खरिपाचा पतपुरवठा आराखडा ४३ हजार ८४४ कोटी रुपयांचा होता. मात्र, नियोजनाप्रमाणे पतपुरवठा झालाच नाही. यंदा तर लॉकडाऊनमुळे खरिपाच्या कर्ज पुरवठयात आणखी गोंधळ होण्याची शक्यता आहे, असे जिल्हा बॅंकांना वाटते. 

शेतीवरील संकट अभूतपूर्व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, देशपातळीवर आगामी खरिपाचा आढावा विविध यंत्रणा घेत असून कुलगुरूंची मते जाणून घेतली जात आहेत. कोरोनामुळे कृषी क्षेत्रात उद्भवलेले संकट मला अभूतपूर्व वाटते. राज्य शासन सर्वांत उत्तमपणे स्थिती हाताळत आहे. मात्र, संचारबंदी हटल्यानंतर शेती आणि ग्रामीण क्षेत्रात सर्व काही पूर्वपदावर येण्यास किमान तीन महिने लागतील. त्याआधीच मॉन्सूनचे आगमन होणार आहे. 

खरीप हंगामावर परिणाम शक्य “मॉन्सूनच्या आधीच राज्यात खते, बियाणे, कीटकनाशके आणि अवजारांच्या क्षेत्रातील नियोजन पूर्वपदावर न आल्यास त्याचा परिणाम थेट खरीप हंगामावर होईल. सर्वांत महत्वाचे म्हणजे सध्या गावपातळीवर शेतकऱ्याला त्याचा मागणीप्रमाणे बियाण्यांचा पुरेसा पुरवठा होईल की नाही याची शाश्वती नाही. वेळेत, पुरेसे, दर्जेदार आणि पसंतीचे बियाणे शेतकऱ्याला न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होतो. सध्या शेतकऱ्याच्या हाती खरिपासाठी गुंतवणुकीला पैसा नाही आणि ज्याच्याकडे आहे त्याला हवे ते काम शेतीत करण्यास अडथळे येत आहेत,” असे डॉ. ढवण यांनी स्पष्ट केले. 

‘महाबीज''ला पुरवठयात अडथळे  विदर्भ, मराठवाडयातील कृषी व्यवस्थेचा कणा असलेल्या कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांच्या बियाण्याबाबत संभ्रमाची स्थिती आहेत. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, पतपुरवठा किंवा मशागतीची कामे करता न आल्यास उत्पादनाला फटका बसू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. राज्यात बियाणे पुरवठ्यात महत्वाचा वाटा असलेल्या सरकारी मालकीच्या ‘महाबीज''च्या सूत्रांनी सांगितले की, “येत्या खरिपासाठी राज्यात ३४ लाख हेक्टरपेक्षा जादा पेरा सोयाबीनचा होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी ७ ते ८ लाख क्विंटल बियाणे लागेल. यातील ८० टक्के बियाणे ‘महाबीज''कडून जाते. आमच्याकडून जास्तीत जास्त पुरवठा वेळेत करण्याची धडपड सुरू आहे. तथापि, बियाणे प्रक्रिया केंद्रांवर कामगार कमी आहेत. मालवाहतुकीच्या देखील अडचणी आहेत. या सर्व अडचणींवर मात करून बियाणे गावपातळीपर्यंत गेले तरी तेथे शेतकऱ्यांना ते वेळेत खरेदी करण्यासाठी हाती पैसा असेल का, तसेच त्याआधी त्यांना जमिनीची मशागत करण्याची संधी मिळालेली आहे का याविषयी अनिश्चितता आहे. 

लॉकडाऊनमुळे विविध अडथळे राज्याला बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांचे व्यासपीठ असलेल्या सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) चे अध्यक्ष अजित मुळे यांच्या म्हणण्यानुसार, बियाणे उत्पादन ते विक्रेत्यांचे गोदाम असा बियाण्याचा प्रवास होतो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे या प्रक्रियेत विविध ठिकाणी अडथळे आलेले आहेत. बियाणे कंपन्यांमधील प्रक्रिया केंद्रे, प्रयोगशाळा, पॅकिंग, वाहतूक ही महत्वाची कामे लॉकडाऊनमुळे कमी क्षमतेने सुरू आहेत. बियाणे क्षेत्राला सर्व पातळ्यांवर वेळीच समजून घेत प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण, पुरवठयातील उशीर किंवा दर्जावर होणारा परिणाम हा एकूण कृषी क्षेत्रावर परिणाम करणारा ठरू शकतो.  महाराष्ट्रातला खरीप हंगाम

  •    खरिपाचे एकूण क्षेत्र :  १४० लाख हेक्टर
  •    कापूस  : ४१ लाख हेक्टर
  •    सोयाबीन : ३४ लाख हेक्टर
  •    कडधान्य : २१ लाख हेक्टर
  •    भात : १५ लाख हेक्टर
  •    ज्वारी : तीन लाख हेक्टर
  •    बाजरी : पाच लाख हेक्टर
  •    मका : आठ लाख हेक्टर
  •  गेल्या खरिपाचा पतपुरवठा आराखडा    ४३ हजार ८४४ कोटी
  • (लागवडीबाबतचे क्षेत्र अंदाजित)
  • खरीप ः २०२०

  • मॉन्सूनबरोबरच यंदा लॉकडाऊनचा कालावधी ठरवणार शेतीचे भवितव्य
  • लॉकडाऊनमुळे मशागतीचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे
  • निविष्ठा, पतपुरवठा वेळेत न झाल्यास उत्पादनाला फटका शक्य
  • सोयाबीन, कपाशीच्या बियाणे पुरवठयात अडचणी 
  • कृषी विद्यापीठांना शेतकरी मेळावे घेता येईनात 
  • विद्यापीठांच्या पातळीवरील बियाणे विक्री अडचणीत
  • पतपुरवठ्याच्या नियोजनासही अद्याप प्रारंभ नाही     राज्याच्या कृषी क्षेत्रातील अडचणी विचारात घेत शासनाच्या पातळीवर २७ मार्चला आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात खते, बियाणे, कीडनाशके  उद्योगाची गैरसोय दूर होईल, अशा पध्दतीने नियोजन केले आहे. वाहतूक, पॅकेजिंग, प्रक्रिया हे मुद्दे आम्ही गृहीत धरून अनेक बाबींना सूट दिली आहे. काही मुद्दे स्थानिक पातळीवर असू शकतात. त्यावर तोडगा काढला जातो. पहिल्या टप्प्यात आम्ही द्राक्षे, मोसंबी, केळी तसेच इतर नाशवंत माल बाजारपेठांमध्ये तसेच ग्राहकांपर्यत जाण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दुसऱ्या टप्प्यात खरिपाचे नियोजन राहील. खतांबाबत आयुक्तालयात नियंत्रण कक्ष उघडला गेला आहे. रेल्वेने शेतमालाची वाहतूक सुरू झालेली आहे. त्यामुळे खरिपात जास्त अडचणी येतील असे वाटत नाही. — एकनाथ डवले,  प्रधान सचिव, कृषी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com