agriculture news in Marathi, Kharip season in Marathwada under threat of drought, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडद

संतोष मुंढे
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

यंदा पावसाचं काही खरं दिसतं नाही. नुसती भूरभूर येती. जुलैच्या मध्यान्हात लावलेल्या कपाशीनं अजून जमीन सोडली नाही अन्‌ भूरभूरीनं तणं वाढल्यानं खर्च वाढला. पीक पाहतां यंदा लागवड खर्चही  निघणार नाही. त्यामुळं शासनान शेतीकाम मनरेगात घेऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करावं. 
- संतोष बोंद्रे, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

औरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील खरिपावर पावसाच्या अवकृपेने संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या एका भागात महापुराचे तांडव, तर मराठवाड्यात पाण्याविना कासावीस पीक, पाणीसाठे व प्रकल्प अशी स्थिती आहे. पावसाच्या अवकृपेने मराठवाड्यात आजपर्यंत सरासरी क्षेत्राच्या जवळपास तेरा टक्‍के क्षेत्र नापेर राहिले. पेरणी झालेली पीक बहुतांश भागातील नुसत्या भुरभुरीने तगली; पण तण पोसले गेल्यापेक्षाही कीड-रोगांच्या संकटाबरोबर खर्चात वाढ झाली आहे. 

सरासरी ७७९ मिलिमीटर सरासरी पाऊस असलेल्या मराठवाड्यात १ जून ते १४ ऑगस्टदरम्यान ४३२.९१ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ २९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अपेक्षेच्या ५९ टक्‍के तर वार्षिक सरासरीच्या केवळ ३१ टक्‍के पाऊस झाल्याची नोंद चिंता वाढविणारी आहे. बहुतांश भागातील पिकांनी अजून जमीन सोडली नाही तर जमीन सोडलेली पिके काही जिल्ह्यांत पावसाअभावी माना टाकायला लागले आहेत.

यंदा मराठवाड्यात ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टरवर खरिपाचे सरासरी क्षेत्र होते. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील २० लाख ८३ हजार ८८५ हेक्‍टर तर लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २९ लाख १२ हजार २९८ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश होता. या क्षेत्राच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४३ लाख ६८ हजार ८६६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांतील १९ लाख ७२ हजार ४१९ हेक्‍टर, तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील २३ लाख ९६ हजार ४४७ हेक्‍टरवरील पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे. 

बऱ्यापैकी सुरवात केल्यानंतर दडी मारून बसलेल्या पावसामुळे औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांतील बहुतांश भागांतील शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ आली. तर सर्वदूर व सतत न पडणाऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबून सरासरी क्षेत्रापैकी १३ टक्‍के जवळपास सव्वासहा लाख हेक्‍टर क्षेत्र नापेर राहिले. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत भात, ज्वारी, बाजरी, मका, आदी तृणधान्याची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली. तर कडधान्याची ७४ टक्‍के, गळीतधान्याची सोयाबीन वगळता पेरणी नगण्यच राहिली. सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन सोयाबीनची पेरणी झाली असली तरी, वाढीच्या काळातच जालना, बीड, लातूर उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाने मारलेल्या दडीचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.  

कपाशीची अपेक्षित क्षेत्रावर लागवड झालीच नाही. लागवडीचे क्षेत्र पाहात कपाशी उत्पादक जिल्ह्यांतच लांबलेल्या पावसाने कपाशीची लागवड शेतकऱ्यांना करणे शक्‍य झाले नसल्याची स्थिती आहे. या कपाशीवर मावा, गुलाबी बोंड अळीचं संकट घोंगावत आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर, अर्धापूर तालुक्‍यात जून च्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कपाशीच्या पिकावर काळा मावा, ज्वारीवर चिकटा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीमध्ये आकस्मिक मर, तूर उमळत असल्याचे आढळून आले. परभणी जिल्ह्यातील मांडाखळी (ता. परभणी) परिसरात कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. 

मकावरील फॉल आर्मी वर्मच संकट नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी त्याला नियंत्रणात आणता आणता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत असल्याची स्थिती आहे. माव्याने पोषक वातावरणाचा फायदा घेत यंदा मूग, उडदावरही आपले बस्तान बसविले आहे. हळद लागवडीस उशीर झाल्यामुळे वाढ खुंटलेली आहे. काही भागात सोयाबीनवर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. उशिरा पेरणी झालेल्या भागातील पिकांची परिस्थिती समाधानकारक नाही. जालना, बीड, लातूर उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांतील ८८७ गावे, वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे.

१३ तालुक्‍यांत नाही ५० टक्‍केही पाऊस 
मराठवाड्यातील एकूण ७६ तालुक्‍यांपैकी ७२ तालुक्‍यात आजपर्यंत अपेक्षित पाऊस झालाच नाही. एवढच काय हिंगोली, बीड, लातूर  व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील १३ तालुक्‍यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यावर तर पावसाची कमालीची अवकृपा राहिली आहे. या जिल्ह्यातील ११ तालुक्‍यांपैकी एकाही तालुक्‍यात अपेक्षेच्या ६० टक्‍के पाऊस झाला नाही.

६२ चारा छावण्यांत ३८ हजार ७३ जनावरे
दुष्काळानं जनावरांच्या चारा पाण्याचे हाल होणाऱ्या मराठवाड्यात ११५३ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ६२ चारा छावण्या आजही बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू आहेत. या छावण्यांमध्ये ३८०७३ लहान मोठी जनावरे आश्रयाला आहेत. 

केवळ २७ टक्‍के कर्जवाटप
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा खरीप पिक कर्जवाटपासाठी ११३१८ कोटी ६६ लाख ४४ हजार रुपयांचा लक्ष्यांक देण्यात आला होता. या लक्ष्यांकाचा पिच्छा करताना बॅंकांनी केवळ २७ टक्‍केच कर्जवाटप केले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ६३ टक्‍के, व्यापारी बॅंकांनी १७ टक्‍के, तर ग्रामीण बॅंकांनी केवळ २८ टक्‍के कर्जवाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रकल्पही तहानलेलेच
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी वगळता १० प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणी आहे. ७५ पैकी २९ मध्यम प्रकल्प कोरडे असून, ३६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. ७४९ लघू प्रकल्पांपैकी ३५२ प्रकल्प कोरडे असून, २८८ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांची तहान अर्धा पावसाळा लोटूनही कायम आहे. 

पावसाच्या प्रयत्नांना ढगांचा खो
मराठवाड्यात ढग मात्र पाऊस नाही, म्हणून पाऊस पाडण्यासाठीचा प्रयत्न शासन व शास्त्रज्ञांच्या पुढाकारातून औरंगाबादेत सुरू करण्यात आला. त्यासाठीची तयारी पूर्ण करून चाचणी म्हणून आकाशात विमानाची झेपही झाली. परंतु त्या प्रयत्नासाठी आवश्‍यक ढगच नसल्याने दोन वेळा झालेल्या प्रयत्नात यश आले नाही. शिवाय दोन दिवसांपासून ढगांअभावी विश्रांती घेण्याची वेळ संबंधित यंत्रणेवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील खरिपाची स्थिती

  • बहुतांश भागांत पिकांनी सोडली नाही जमीन
  • यंदा लागवड खर्चही निघणे कठीण दिसण्याची चिन्ह
  • पावसासाठीच्या प्रयत्नांना ढगांचा खो
  • बीड, उस्मानाबादमध्ये अजूनही जनावरे चारा छावण्यांत आश्रित
  • ८८७ गावे, वाड्यांची तहान भागविण्यासाठी हजारांवर टॅंकर
  • खरीप पीक कर्जवाटपही २६ टक्‍क्‍यांपुढे सरकलेच नाही
  • कपाशी उत्पादक जिल्ह्यातच घटले कपाशीचे क्षेत्र

जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी (हेक्‍टरमध्ये)

जिल्हा     सर्वसाधारण    प्रत्यक्ष पेरणी
औरंगाबाद ७३२८४६   ६६६२२४
जालना  ५८७२५७ ५५४४५७
बीड  ७६३७८२ ७५१७३८
लातूर ६२४८६५ ४७२९३४
उस्मानाबाद    ४१२९७०   ३८८६५६
नांदेड ८४८९२७  ७१२१०७
परभणी    ६२४२४८  ४५५८८०
हिंगोली  ४०१२८८  ३६६८७०

प्रतिक्रिया
जवळपास ३५० ते ४०० मिलिमीटर सरासरी पाउस पडणाऱ्या आमच्या गावशिवारात आजवर फक्‍त ८७ मिलिमीटर पाऊस झाला. १ ते १५ मिलिमीटर पडलेल्या पावसानं पीक कशीबशी आजवर तगली. पण आता फुलातील सोयाबीन, वाद्या धरलेल्या मूग व मक्याला पाण्याची नितांत गरज आहे. जमीनीत खोलवर ओल गेलीच नाही. विहिरींची अवस्था अजूनही मे महिन्याप्रमाणेच आहे. 
- निवृत्ती घुले, वखारी, जि. जालना. 

यंदा आमच्या भागात पावसाचे आगमन उशिरा झाले. जून महिन्यात पेरणीकेल्यानंतर पावसाचा खंड पडला. उगवण व्यवस्थित न झाल्यामुळे सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यानंतर अधूनमधून पाऊस सुरू असल्यामुळे सध्या पीक परिस्थिती बरी आहे. परंतु कीड, रोगाचा प्राद्रुर्भाव झाला आहे. पाणीटंचाई कायम असल्यामुळे फवारणीसाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. गवत न उगवल्यामुळे तसेच विहिरींना पाणी न आल्यामुळे जनावराच्या चारा पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
- अरुण जाधव, कुडली, ता. देगलूर, जि. नांदेड


इतर अॅग्रो विशेष
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...