संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोल्यातून खरिपासाठी ८५ हजार टन खतांची मागणी

अकोला  ः  येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याचे नियोजन तयार करण्यात आलेले असून, या हंगामात सुमारे ८५ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज भासणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे ८४ हजार ९९० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने एनपीके व युरियाची सर्वाधिक मागणी आहे.

खरीप हंगामासाठी पीक नियोजन करण्यात आलेले आहे. संभावित पिकांची लागवड पाहून खतांचे नियोजन झाले आहे. अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, ज्वारी ही पिके खरिपात घेतली जातात. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने एनपीके खतांचे २४ हजार ३४१ मेट्रिक टनांचे नियोजन केले. तसेच २४ हजार १९० मेट्रिक टन युरियाची मागणी केली. यासोबतच जिल्ह्यात डीएपी १४७५० मेट्रिक टन, एमओपी ४६९०, एसएसपी १७०१९ मेट्रिक टन अशी एकूण ८४ हजार ९९० मेट्रिक टन खतांची गरज भासणार असून, तसे नियोजन वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे.

दरवर्षी रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. सेंद्रिय निविष्ठांचा उपयोग करणारे शेतकरी वाढलेले असताना रासायनिक खतांचा वापरसुद्धा कमी झालेला नाही. त्यामुळेच प्रशासनाकडून सुमारे ८५ हजार मेट्रिक  टन खतांची मागणी करण्यात आलेली आहे.  

४ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज अकोला जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र चार लाख ८२ हजार ६२० हेक्टर असून, या वेळी ४ लाख ८० हजार ५० हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनची एक लाख ६५ हजार हेक्टरवर लागवड होऊ शकते. या शिवाय संकरित कापसाची एक लाख ६० हजार, सुधारित कापसाची पाच हजार, ज्वारीची १८,५५०, बाजरीची १९०, मक्याची ५००, तुरीची ५८,३००, मुगाची ३१,३५०, उडदाची २५,२००, तिळाची ६८०, तर इतर पिकांची १४,७८० हेक्टरवर लागवड होऊ शकते. पिकपॅटर्न लक्षात घेऊन रासायनिक खतांचे नियोजन सादर करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com