हिंगोली जिल्ह्यात खरिपात तूर, मूग, उडीद, हळदीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली  : हिंगोली जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप हंगामात ३ लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित पेरणी क्षेत्र सरासरी क्षेत्राच्या तुलनेत कमीच राहणार असले तरी, गतवर्षीपेक्षा त्यात अल्प वाढ अपेक्षित आहे. गतर्षीच्या तुलनेत यंदा तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या क्षेत्रात वाढ तर सोयाबीन, कपाशीच्या क्षेत्रात घट अपेक्षित आहे. यंदा हळदीच्या क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात डोंगराळ भाग असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कोरडवाहू पिकांचे क्षेत्र जास्त आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ८४ हजार ४५६ हेक्टर आहे. २०१८ मध्ये ३ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ३ लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य नगदी पीक झाले आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ८६ हजार ७८१ हेक्टर असताना गतवर्षी २ लाख ३६ हजार ८२९ हेक्टर पेरणी झाली होती. यंदा २ लाख ३४ हजार ८२९ हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. जिल्ह्यात खरीप पिकांच्या एकूण क्षेत्रापैकी ६७.४४ टक्के क्षेत्र एकट्या सोयाबीनचे आहे.

कपाशीचे सरासरी क्षेत्र ८२ हजार ६३१ हेक्टर आहे. परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळल्याने कपाशीच्या क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे. गतवर्षी ४६ हजार २८२ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ४३ हजार ६८४ हेक्टर लागवड अपेक्षित आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ३४ हजार ९२२ हेक्टर आहे; परंतु सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जात आहे असल्याने तुरीचे क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी ४१ हजार ६० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. यंदा ४३ हजार ११० हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे.

मुगाचे सरासरी क्षेत्र १७ हजार १३३ हेक्टर आहे. परंतु मुगाच्या क्षेत्रात घट झाली आहे. गतवर्षी ८ हजार ४६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा १ हजार ३०० हेक्टरने मुगाचा पेरा वाढण्याचा अंदाज आहे. उडदाचे सरासरी क्षेत्र १६ हजार २४५ हेक्टर आहे. गतवर्षी ६ हजार ५०३ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. यंदा ८ हजार ३ हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली आहे.

ज्वारीचे सरासरी क्षेत्र ४० हजार ६२७ हेक्टर असताना गतवर्षी ६ हजार १३९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ६ हजार ३३९ हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. बाजरी, तीळ, कारळे, भुईमूग, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे.

सोयाबीननंतर जिल्ह्यातील महत्त्वाचे बागायती नगदी पीक असलेल्या हळदीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. गतवर्षी ३४ हजार २२८ हेक्टरवर हळद लागवड झाली होती. यंदा ३६ हजार २९९ हेक्टरवर हळद लागवड होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com