पुणे जिल्ह्यात खरिपाची तयारी सुरू 

माझ्याकडे एकूण सात ते आठ एकर शेती आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चांगला पाऊस होतोय. भात रोपवाटिकेसाठी पूर्वमशागतीचे काम सुरू आहे. बियाणे खरेदी करायची आहे. दोन ते चार दिवसांत भात रोपवाटिका टाकणार आहे. - अनिल जेधे, शेतकरी, चिखलगाव, ता. भोर.
खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात झाली असून, सोयाबीन पिकाची पेरणी करताना प्रगतिशील शेतकरी सुभाष रासकर.
खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात झाली असून, सोयाबीन पिकाची पेरणी करताना प्रगतिशील शेतकरी सुभाष रासकर.

पुणे  : जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहेत. पूर्व पट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तर पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांसाठी लगबग सुरू केली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास पेरण्यांना व भात रोपवाटिकेच्या कामांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.  

पुणे जिल्ह्यात खरिपात दोन लाख ३० हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात. चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा कृषी सेवा केंद्रांतून खरेदी करण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांची तयारी सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत चांगला पाऊस झाल्यास रोपवाटिकेच्या कामांना आणखी वेग येईल. सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून चार हजार ९९१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. भात लागवडीसाठी दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात होतील अशी शक्यता आहे. 

गाव परिसरात अजून फारसा पाऊस झाला नाही. सध्या पावसाची वाट पाहत आहे. खरिपात मूग, कांदा, बाजरीची लागवड व पेरणी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शेत नांगरून, पाळी घालून तयार ठेवले आहे. पाऊस झाल्यानंतर पेरणी करता येईल, असे कर्डे (ता. शिरुर) येथील शेतकरी  भाऊसाहेब पळसकर, यांनी सांगितले.  

पुणे जिल्ह्यातील खरीप पीकनिहाय क्षेत्र (हेक्टर) ः   भात ६२,५००, ज्वारी १०२०, बाजरी ४१,१८६, रागी ४०००, मका २५,९५०, इतर तृणधान्ये १५,६००, तूर २११२, मूग १८,५००, उडीद १८६३, इतर खरीप कडधान्ये १४,६३९, भुईमूग १६,८७०, तीळ १४०, कारळा ११००, सूर्यफूल ९५, सोयाबीन २५,०००, कापूस १५०, इतर गळीतधान्ये २००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com