खरिपाची ३१५ लाख हेक्टरवर पेरणी 

यंदा देशभरात मॉन्सून वेळेआधीच दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परिणामी पेरण्यांनी वेग घेतला.
kharip sowing
kharip sowing

नवी दिल्ली: यंदा देशभरात मॉन्सून वेळेआधीच दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परिणामी पेरण्यांनी वेग घेतला. देशात आतापर्यंत खरिपाची ३१५.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात केवळ १५४.५ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १०४ टक्के पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. 

कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, खरिपाची पेरणी ही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते. देशातील अनेक भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकत्या घेतल्या. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दुपटीने अधिक पेरणी झाली आहे. हवामान विभागाच्या मते देशात आतापर्यंत सरासरीच्या २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जून महिन्यातील पावसाची सरासरी ही १३५.६ मि.मी. असते तर आतापर्यंत १६५.१ मि.मी. पाऊस झाला आहे. मध्य भारतात सरासरीच्या ४४ टक्के, पूर्व आणि नैऋत्य भारतात १३ टक्के तर दक्षिण भागात सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.  मॉन्सूनच्या काळात ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याने पेराही वाढत आहे. खरिपातील महत्त्वाच्या भात पिकाची लागवड यंदा ३५ टक्क्यांनी वाढली आहे. आतापर्यंत भाताची ३७.७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उसाचे क्षेत्रही १.३ टक्क्यांनी वाढले असून ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली. कापसाची लागवड यंदा १६४ टक्क्यांनी वाढली आहे. आतापर्यंत ७१.७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. कडधान्याचाही पेरा २२२ टक्क्यांनी वाढून १९.४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.  भरडधान्याची आतापर्यंत ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी याच काळात २४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यात मका लागवडीत मोठी वाढ झाली आहे. 

तेलबिया पिकांची पेरणी पाच पटीने वाढली  सरकारने यंदा तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी तेलबिया पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे या राज्यांतील शेतकरी कापूस पिकांकडून तेलबिया पिकांकडे वळाले आहेत. त्यामुळे तेलबिया पिकांखालील क्षेत्रात जवळपास पाच पटीने वाढ झाली आहे. देशात तेलबियांच्या आतापर्यंत ८३.३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी याचा काळात केवळ १३.३ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा पेरणीत तब्बल ५२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  सोयाबीनकडे कल  गेल्या हंगामातील काही पिकांच्या हमीभावाने खरेदीचा पुरता फज्जा उडाल्याने काही राज्यांतील शेतकरी इतर पिकांकडे वळाले आहेत. यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी तेलबिया पिकांना प्राधान्य दिले. त्यातही सोयाबीनला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेलबिया पिकांमध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक वाढला आहे. गेल्यावर्षी याच काळात २.६६ लाख हेक्टरवर सोयाबीन होते. यंदा मात्र ६३.२ लाख हेक्टरवर सोयाबीन आहे. यंदा पेरणीत तब्बल २२७८ टक्के वाढ झाली आहे. भुईमूग लागवडीतही वाढ झाली आहे. 

खरिपातील पेरणी दृष्टिक्षेपात (लाख हेक्टरमध्ये) 

पीक २०२०-२१ २०१९-२० बदल (टक्के) 
भात ३७.७१ २७.९३ ३५.० 
तूर ९.८७ १.८३ ४३९.३ 
उडीद २.७५ ०.९० २०५.६ 
मूग- ५.३० २.०६ १५७.३ 
इतर कडधान्य १.४६ १.२३ १८.७ 
एकूण कडधान्य १९.४० ६.०३ २२१.७ 
ज्वारी २.८३ १.१३ १५०.४ 
बाजरी ११.५१ ५.३५ ११५.१ 
मका ३१.२७ १५.७४ ९८.७
तृणधान्य १.११ १.०४ ६.७ 
रागी १.२२ १.२१ ०.८ 
भरडधान्य ४७.९६ २४.४८ ९५.९ 
भुईमूग १८.४५ ९.८१ ८८.१ 
सोयाबीन ६३.२६ २.६६ २२७८.२ 
सूर्यफूल- ०.३२ ०.२४ ३३.३ 
तीळ १.१४ ०.४५ १५३.३ 
एकूण तेलबिया ८३.३१ १३.३२ ५२५.५ 
ऊस ४९.६९ ४९.०३ १.३ 
ताग ५.८८ ६.६६ (-)११.७
कापूस ४४.४१ २७.०८ १६४.७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com