पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा कायम 

राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात असतानाही बॅंकांकडून नियोजनाप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जवाटप झालेले नाही.
rabi sowing
rabi sowing

पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात असतानाही बॅंकांकडून नियोजनाप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जवाटप झालेले नाही. मात्र या गोंधळात अकोला जिल्ह्यातील बॅंकांनी लक्ष्यांकांपेक्षाही जादा कर्जवाटप करीत इतर जिल्ह्यांसमोर आदर्श ठेवला आहे. 

चालू खरिपात ५० लाख शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपये कर्ज आम्ही वाटणार आहोत, त्यासाठी अत्यावश्यक असलेले नियोजन आम्ही केले आहे, असे बॅंकांनी स्वतःहून राज्य शासनाला सांगितले होते. प्रत्यक्षात १० जुलैपर्यंत फक्त २७ लाख ५२ हजार शेतकऱ्यांपर्यंत बॅंका पोहोचू शकल्या. या शेतकऱ्यांना वाटलेली कर्जरक्कम २१ हजार ३१ कोटी रुपये आहे. 

मराठवाडा विभागातील सहकार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात खरीप पेरा ५० टक्क्यांच्या पुढे गेलेला होता. मात्र तोपर्यंत ४५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत होते. खरीप पेरण्या आता जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. सोयाबीन, कापूस, कडधान्य या मुख्य पिकांचा पेरा पूर्ण झाला आहे. त्यामुळे बॅंकांच्या कर्जवाटप नियोजनाची अवस्था ‘वरातीमागून घोडे’ अशीच आहे. किमान १५ जूनपर्यंत कर्जरक्कम हाती पडली तरच त्याचा उपयोग खरीप नियोजनासाठी शेतकऱ्यांना होतो.” 

कर्जवाटपात औरंगाबाद विभागातील बॅंकांची कामगिरी वाईट समजली जात आहे. नियोजनानुसार, मराठवाड्यातील १६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना ११ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज देण्याची जबाबदारी बॅंकांनी घेतली होती. मात्र खरिपाच्या सुरुवातीपासूनच बॅंकांनी कर्जवाटप संथगतीने सुरू ठेवले. त्यामुळे जुलैचा दुसरा आठवडा आला, तरी १० लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नव्हते. विदर्भात नागपूर विभागातील बॅंकादेखील कर्जवाटपात पिछाडीवर आहेत. या विभागातील चार लाख ६२ हजार शेतकऱ्यांपैकी दोन लाख १० हजार शेतकरी कर्जापासून वंचित होते. 

विभागनिहाय कर्जवाटपात त्यातल्या त्यात अमरावती (६३ टक्के) व पुणे (६७ टक्के) विभागाने आघाडी घेतली होती. जिल्हानिहाय कर्जवाटपात उत्तम कामगिरी पाच जिल्ह्यांची आहे. त्यात अकोला (१०३ टक्के), भंडारा (९४ टक्के), कोल्हापूर (९३ टक्के), ठाणे (८९ टक्के) तसेच वाशीमच (८० टक्के) समावेश होतो.  आठ ते नऊ टक्के कर्जवाटपातून अनास्था उघड  राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जवाटपात निराशाजनक कामगिरी बजावत आहेत. पंजाब-सिंध बॅंकेने २४७० शेतकऱ्यांना; तर युको बॅंकेने २४३२९ शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे होते. प्रत्यक्षात १० जुलैपर्यंत अनुक्रमे ८ टक्के आणि ९ टक्के कर्ज वाटत या बॅंकांनी आपली अनास्था सिद्ध केली. याउलट बॅंक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बॅंक ऑफ इंडियाने ७८ हजार (४० टक्के), तर बॅंक ऑफ महाराष्ट्रने १० लाख शेतकऱ्यांना (४३ टक्के) कर्ज वाटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com