परभणी जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्रातील वाढ कायम राहण्याचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप हंगामात ५ लाख २९ हजार  ५४२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ६ हजार २१० हेक्टरने तर गतवर्षीपेक्षा २ हजार २४२ हेक्टरने वाढ गृहीत धरण्यात आली आहे. सोयाबीन क्षेत्रातील वाढ कायम राहण्याचा तसेच कपाशीच्या क्षेत्रात घट होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिरायती बहुल क्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २३ हजार ३३२ हेक्टर आहे. २०१८ मध्ये ५ लाख २७ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली होती. गतवर्षी ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, कापूस तसेच तीळ, कारळ, मटकी आदी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मिळून एकूण १ लाख ५२ हजार ४३३ हेक्टरने घट झाली होती. सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात १ लाख  ५६ हजार ४०१ हेक्टरने वाढ झाली होती. 

या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये ५ लाख २९ हजार ५४२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ६४० हेक्टर असताना यंदा २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात ४ हजार ९५९ हेक्टरने तर सरासरी क्षेत्राच्या १ लाख ६१ हजार ३६० हेक्टरने वाढ अपेक्षित आहे. कपाशीचे सरासरी क्षेत्र २ लाख ९ हजार ५०० हेक्टर आहे. यंदा १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे.कपाशीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ४ हजार ८६९ हेक्टरने तर सरासरी क्षेत्राच्या १४ हजार ५०० हेक्टरने घट होण्याची शक्यता आहे. 

तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६२ हजार ७०२ हेक्टर आहे. यंदा ४५ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. तुरीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २ हजार ५३ हेक्टरने वाढ अपेक्षित आहे. मात्र सरासरी क्षेत्रापेक्षा १७ हजार ७०२ हेक्टरची घट राहणार आहे. मूग, उडीद ही कडधान्ये तसेच ज्वारी, बाजरी या अन्नधान्य पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली घट यंदाही कायम राहणार आहे.

मूगाचे सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार ६७७ हेक्टर असतांना यंदा २२ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहेत. मुगाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ६ हजार ३३९ हेक्टरने तर सरासरी क्षेत्रापेक्षा ३० हजार ६७७ हेक्टरने घट होणार आहे. उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार ५२३ हेक्टर असून, यंदा ९ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. उडदाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा साडेआठशे हेक्टरने वाढ तर सरासरी क्षेत्रापेक्षा ५ हजार ५२३ हेक्टरने घट होईल.

ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ९५० हेक्टर असून यंदा ५ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. ज्वारीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत थोडी वाढ होणार असली तरी, सरासरी पेक्षा ६४ हजार ९५० हेक्टरने घट कायम राहणार आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ६ हजार ६३० हेक्टर आहे यंदा केवळ ५०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहेत. बाजरीच्या सरासरी क्षेत्रापेक्षा ६ हजार १३० हेक्टरची घट राहणार आहे.    

पीकनिहाय सरासरी क्षेत्र, गतवर्षीचे क्षेत्र, प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक  सरासरी क्षेत्र २०१८ २०१९
सोयाबीन  ८८,६४०  २,४५,०४१   २,५०,०००
कापूस २,०९,५०० १,९९,८६९   १,९५,०००
तूर  ६२,७०२  ४२,९४७  ४५,०००
मूग  ५२,६७७  २४,३३८ २२,०००
उडीद  १४,५२३   ८१४९  ९०००
ज्वारी   ६९,९५० ४६८८ ५०००
बाजरी   ६६३०   ४५६ ५००
इतर   १८,७१० १८१२ ३०४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com