पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने झाल्या आहेत. सध्या पुणे विभागात अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४९० हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत नऊ लाख ८० हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १२४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. काही तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पेरणीचे प्रमाण कमी आहे. पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदा शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे विभागात पेरण्या व भात लागवडीदेखील उशिरा सुरू झाल्या. सध्या नगर जिल्ह्यात पीक परिस्थिती सर्वसाधारण असून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अकोले तालुक्यात भात पिकाची १५ हजार ४९० हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे. बाजरी पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने क्षेत्रीय कर्मचारी भेटी देऊन अळीच्या नियंत्रणासाठी मेळावे, बैठका, चर्चासत्रे घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे चालू आहेत. मूग व उडीद ही पिके काही ठिकाणी फुले लागण्याच्या अवस्थेत आहेत. मूग पिकाची पेरणी उशिराने झाल्याने शेंगा लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कापूस पीक वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे चालू आहेत. 

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमधील पश्चिम भागात सुमारे ५५ हजार ३८९ हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोपवाटिकेची लागवड झाल्याने पुनर्लागवडीसुद्धा उशिराने झाल्या आहेत. तर यांत्रिकीकरणाद्वारे सुमारे ३१० एकरांवर भात लागवड झाली आहे. पेरणी झालेली बाजरी व सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. मका पीकवाढीच्या अवस्थेत असून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. 

सोलापूरमध्ये ज्वारी आणि बाजरी पिकाची वाढ चांगली असून हे पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. उडीद पीक वाढीच्या अवस्थेत असून काही तालुक्यामध्ये फुलोऱ्यांच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक ८० हजार ३२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यातही ५६ हजार २८३ हेक्टरवर पेरणी झाली असून दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माढा, करमाळा, सांगोला या तालुक्यातही चांगली पेरणी झाली आहे. तर उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत कमी पेरणी झाली आहे.    

जिल्हानिहाय खरीप पेरणी स्थिती (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के
नगर ४,७८, ६४० ५,५७,१०७ ११६
पुणे २,३०,८३० १,६६,४८१ ७२
सोलापूर ७९,०२० २,५७,१९४ ३२५
एकूण ७,८८,४९० ९,८०,७८२  १२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com