पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के क्षेत्रावर पेरा

खरिपात पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली आहे
खरिपात पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली आहे

पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही जोरदार पाऊस झालेला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पुणे विभागात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर असून, त्यापैकी दोन लाख ८४ हजार ८५२ हेक्टरवर म्हणजेच ३६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके उगवून वर आली असून, पावसाअभावी सुकत असल्याचे चित्र आहे. 

यंदा जोरदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र, मॉन्सून उशिराने दाखल झाल्याने पुणे विभागात अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. जून महिन्यात नगर जिल्ह्यात १०३.०, पुणे जिल्ह्यात १६८.५ व सोलापूर जिल्ह्यामध्ये ६९.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ ते १२ जुलै या कालावधीत नगरमध्ये ५०.२, पुण्यामध्ये २१६.४ तर सोलापूरमध्ये सर्वांत कमी म्हणजेच २४.७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. विभागातील काही भागांत हलक्या सरी अधूनमधून बरसल्या आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा व नगरमधील अकोले तालुक्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून खरिपाच्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरवात केली असली तरी, पुढील काळात पुरेसा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 

नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली आहे. तर काही ठिकाणी शेतकरी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हलक्या स्वरूपाच्या सरी पडलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. अकोले तालुक्यात १३७५ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या असून २२४ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड या तालुक्यांत अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, इंदापूरमध्ये तुरळक ठिकाणी बाजरी, तूर, मगू, मका, भूईमूग व सोयाबीन पिकांच्या अल्प पेरण्या झाल्या आहेत. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत भात व नाचणीच्या रोपवाटिकेत रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. या भागात चांगला पाऊस पडल्यामुळे सात हजार २९२ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.

सोलापूरमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीस सुरवात झाली असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, सोयाबीन व सूर्यफूल पिकांच्या अल्प प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकांची उगवण चांगली असली तरी पिकांस जोरदार पावसाची आवश्यकता आहे.  

जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के 
नगर ४,७८,६४० १,७०,५११ ३६
पुणे  २,३०,८३० ३३,४८३ १४
सोलापूर ७९,०२०  ८०,८५८ १०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com